मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या वाहनवरील लाल व निळे दिव्यांबाबत सर्व स्तरातून टीका झाल्यावर महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनावरील लुकलुकणारे दिवे (flasher lights) पालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत.

मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर असलेल्या लाल व निळ्या दिव्यांमुळे त्या पुन्हा एकदा वादात सापडल्या होत्या. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून महापौरांवर आणि भाजपवर टीका झाली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनावरील दिवे हटवले आहेत. संदर्भात प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,

पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाल्यावर त्यांना वाहने पुरवली जातात. या वाहनांवरील लुकलुकणाऱ्या दिव्यांसंदर्भातील बाब निदर्शनास येताच पदाधिकारी यांच्या वाहनावरील लुकलुकणारे दिवे (flasher lights) पालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत.

केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली आहे. मात्र भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवर येताच या नियमाला बगल देत महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनाच्या पुढच्या बाजूस निळे व लाल दिवे बसवण्यात आले होते. त्यावरून समाजमाध्यमावरूनही टीका होऊ लागली होती.

नियम काय सांगतो भारत सरकारच्या १ मे २०१७ च्या राजपत्र अधिसूचनेनुसार सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नावफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी आहे. फक्त अग्निशमन सेवा, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन सेवा या सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत लाल, निळा, पांढरा, रंगीबेरंगी दिवा वापरण्याची परवानगी आहे. वाहन अधिकृत कामावर नसताना असा रंगीत दिवा वापरणे बेकायदेशीर आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासन कडक कारवाई करू शकते.

नऊ वर्षापासून बंदी.. केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नावफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने व्हीआयपी संस्कृती संपवल्यामुळे त्यावेळी या निर्णयाचे कौतुक झाले होते.

नऊ वर्षांपूर्वी जेव्हा हा नियम आला तेव्हा केंद्र सरकारसह सर्वच राज्यातील मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे बंद झाले. एवढेच काय तर देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढण्यात आला.

किशोरी पेडणेकर यांचीही टीका

२०१७ ला याविषयावर फार मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर अश्या गाडीवर लाल निळे दिवे लावले जाऊ नयेत असा नियम झाला. मी सुद्धा महापौर राहिलेली आहे मला जे नियम सांगण्यात आलेले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. प्रोटोकॉल विचारून महापौरानी माहिती घेतली नाही का ? असाही सवाल पेडणेकर यांनी केला आहे.