मुंबई : शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आदेश देऊनही गैरहजर राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बुधवारी एक हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच, पुढील सुनावणीलाही तावडे या गैरहजर राहिल्यास त्यांच्या नावे वॉरंट काढण्याचा आणि त्यांच्या जामिनाचे बंधपत्र रद्द करण्याचा इशारा दिला.
ही घटना २०१६ मध्ये घडली होती आणि २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल होऊनही अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत, असे निरीक्षणही अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी महापौरांना उपरोक्त इशारा देताना नोंदवले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. तथापि, तावडे आणि इतर दोन आरोपींची सुनावणीला सततची गैरहजेरी ही खटला लांबवण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
यापूर्वीच्या सुनावणीत, वैयक्तिक उपस्थिती लावण्यापासून सूट मिळवण्याचा अर्ज मंजूर केल्यानंतर न्यायालयाने तावडे यांना ३०० रुपयांचा दंड आकारला होता. तथापि, बुधवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले, तेव्हा तावडे आणि इतर दोन आरोपींनी पुन्हा एकदा उपस्थिती लावण्यापासून सूट देण्याची मागणी केली. मुंबईच्या प्रथम नागरिक असल्याने महापौरांचे वेळापत्रक व्यग्र असते आणि त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते, असे सुनावणीला अनुपस्थित राहण्याची मुभा मागताना तावडे यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तर, इतर दोन आरोपींतर्फेही ते समाजसेवक आहेत आणि त्यांचेही वेळापत्रक व्यग्र असल्याने ते सुनावणीला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी मात्र तावडे आणि अन्य दोन आरोपींच्या अर्जाला विरोध केला. तसेच, हे प्रकरण अनेक वर्षे जुने आहे आणि आरोपी जाणीवपूर्वक न्यायालयात हजर राहणे टाळत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश भन्साळी यांनी या युक्तिवादाची दखल घेतली आणि महापौरांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावून तो एक आठवड्याच्या आत सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले. मात्र, आरोप निश्चित करण्यासाठी पुढील तारखेला (२ नोव्हेंबर) आरोपींनी न्यायालयात हजर राहावे. अन्यथा त्यांच्या नावे वॉरंट काढण्यात येईल आणि त्यांचे जामिनाचे बंधपत्रही रद्द करण्यात येईल, असे न्यायालयाने त्यांना बजावले. आरोप निश्चितीनंतर आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.
प्रकरण काय ?
ही घटना २९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील महापालिका संचालित एका उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली होती. पोलिसांच्या आरोपांनुसार, तत्कालीन नगरसेवक तावडे आणि इतर सहा जणांनी शाळेत प्रवेश केला आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका शिक्षकाच्या बदलीवरून व्यवस्थापनाशी वाद घातला. या वादादरम्यान आरोपींनी व्यवस्थापनाला शिवीगाळ केली आणि शाळेतील इतर दोन शिक्षकांवर हल्ला केला. या प्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
