मुंबई : पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत उभी होती. पाऊस पडत असल्याने घरी जाण्याची घाई, हातात बाळ व तासभर वाट पाहूनही रिक्षा मात्र मिळत नव्हती. त्यातच हातातील बाळ रडत असल्याने तिचा जीव कासावीस झाला होता. त्याचवेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तावडे यांनी गाडी थांबवली आणि त्या महिलेची विचारपूस करून क्षणाचाही विलंब लावता मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या नवजात कन्येचा रुग्णालयापासून घरापर्यंत प्रवास खास ठरला.

मुंबईतील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयासमोर एक बाळंतीण आपल्या नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत उभी होती. पाऊस पडत असल्याने घरी लवकर जाता यावे यासाठी ती व तिचे कुंटुंबिय रिक्षा थांबविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्यातच हातातील बाळ रडत असल्याने त्या महिलेचा जीव कासावीस झाला होता. त्याचवेळी रितू तावडे संत मुक्ताबाई रुग्णालयातील आपला पाहणी दौरा आटपून बाहेर पडत असताना त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या महिलेला पाहिले. रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून रितू तावडे यांनी गाडी थाबवली आणि त्या महिलेची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता रितू तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

त्या बाळाच्या आईची वेदना त्यांनी तात्काळ ओळखली. त्यांनी बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे कुर्ला येथील खैरानी मार्ग येथील घरी पोहोचवले. जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला. हा क्षण त्या बाळंतिणीसाठी, तिच्या कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. महापौरांनी त्या बाळाला प्रेमाने भेट दिली. तर आईला शुभेच्छा दिल्या. या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. मोठेपण पदात नसते, ते मनात असते हे या प्रसंगाने सिद्ध झाले.