मुंबईतील कुर्ला येथील नौपाडा भागात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर भलेमोठे झाड पडल्याची दुर्घटना घडली असून त्यात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सातत्याने झाडे पडून नागरिकांचे जीव जात असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीसा संताप व्यक्त करतच प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये पालिका प्रशासनाला पाठिशी घालण्याचं किंवा पाठिंबा देण्याचं काम नाही. या ठिकाणी एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते त्या ठिकाणी त्यांचं दुकान उघडण्यासाठी आलेले होते, अशी माहिती आहे, या ठिकाणी जे झाड पडलं ते डेंजर झोनमध्ये दिसत होतं, तसं पत्र देण्यात आलं होतं, मात्र पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं नाही. हा चौकशीचा भाग आहे, ती केली जाईल मात्र मी पुन्हा पुन्हा सांगते पालिकेमध्ये महायुती आहे, महापौर म्हणून मी असेल किंवा उपमहापौर म्हणून घाडी असतील किंवा इतर नगरसेवक आहेत, पण ज्या पद्धतीचं चित्र विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे, की, सत्ताधारी किंवा महापौर कंत्राटदारांना पाठिशी घातलं जातं आहे, असं वक्तव्य करून ते मुंबईकरांची दिशाभूल करत असतील तर त्याचा मी निषेध करते, असंही पुढे रितू तावडे म्हणाल्या आहेत.

मी स्वतः व्हिडीओ करुन लोकांना आवाहन केलं-रितू तावडे

यानंतर त्या म्हणाल्या सकाळी मला जेव्हा मुसळधार पावसाचा आणि अलर्टचा आढावा मिळाला तेव्हा मी एक व्हिडीओ करून लोकांना आवाहन केलं, आज उद्या परवा, तीन दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत, त्यामुळे झाडांच्या खाली, विजेच्या खांबाखाली थांबू नका, मोठ्या झाडांखाली वाहनं पार्क करू नका असं आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही केलं आहे. एकीकडे आम्ही अशा घटना घडू नये म्हणून आवाहन करत आहे, या ठिकाणी राजकारण करू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, राजकारण करून उपयोग नाही, तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, हे बोलण्याची वेळ आहे का ही, ज्या प्रकारे फोनवरुन सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर किंवा मनसेचे असतील, महापौरांना काय इच्छा आहे का? की झाडं पडावीत, मुंबईकरांना काहीतरी व्हावं अशी आमची इच्छा आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आम्ही वॉर फुटिंगवर काम करत आहोत-रितू तावडे

“मुंबईत सध्या मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि समुद्राला आलेली हायटाईड यामुळे सर्व यंत्रणांवर ताण आहे. अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप करणे बंद करून विरोधकांनी मैदानात उतरून काम करावे. मी स्वतः आणि मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी २४ तास ‘वॉर फुटिंग’वर काम करत आहोत,” अशा शब्दांत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शिवसेना (उबाठा) आणि मनसेवर तीव्र शब्दांत पलटवार केला.