Ritu Tawde On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची मागील काही दिवसांपासून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. भोंदू अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयातून पोलिसांना तब्बल ५८ चित्रफिती आढळून आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचेही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे यावरून राज्याच्या राजकारणात दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?

यातच आज अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रितू तावडे म्हणाल्या की, “अशोक खरातला तर ठेचून मारलं पाहिजे. अजूनपर्यंत अशोक खरात जिवंत कसा आहे? याचं मला आश्चर्य वाटतंय”, असं म्हणत रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला.

जैनमुनींबाबतच्या वक्तव्याबद्दल महापौर रितू तावडे यांचं स्पष्टीकरण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. ‘गुरुदेवजींच्या चमत्कारामुळे माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली’, असं रितू तावडे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अखेर आज महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं.

रितू तावडे म्हणाल्या की, “मी सर्वांना सांगू इच्छिते की मंगळवारी बोरीवलीत नम्रमुनी महाराज यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुंबईतील डब्बेवाले यांच्यासाठी ई-बाईक आणि दिव्यांगांसाठी काही बाईक या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच मुक्या प्राण्यांसाठी हॉस्पिटलचंही उद्धघाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नम्रमुनी महाराज यांना मानणारे भक्तही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मी माझ्या मनात असणारा आदर व्यक्त केला”, असं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलं.

“मी भाषणात बोलताना असं सांगितलं की गेल्या दीड वर्षांपासून मला घशाचा त्रास होता. यासाठी उपचार देखील सुरू होते. पण जेव्हा नम्रमुनी महाराज यांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला ‘ओम’चा उच्चार करण्यास सांगितलं. आम्ही गुजरातला त्यांच्या आश्रमात गेलो होतो, तेव्हा त्यांनी आमच्याकडून ‘ओम’चा उच्चार करून घेतला होता. त्यानंतर मी माझ्या घरी देखील ‘ओम’चा उच्चार करते. याचा परिणाम असा झाला की माझा आवाज चांगला झाला. त्यामुळे मी माझी भावना त्या कार्यक्रमात व्यक्त केली. यामध्ये कुठंही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम केलं नाही. आम्ही स्वामी समर्थ, साईबाबा यांचे भक्त आहोत. नम्रमुनी महाराज यांना आम्ही फॉलो करतो”, असं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलं.