Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. ‘गुरुदेवजींच्या चमत्कारामुळे माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली’, असं रितू तावडे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अखेर आज महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी ट्रोल करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. ‘ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला हाड आहे की नाही? तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही?’, असं म्हणत रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
रितू तावडे काय म्हणाल्या?
“मी सर्वांना सांगू इच्छिते की मंगळवारी बोरीवलीत नम्रमुनी महाराज यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुंबईतील डब्बेवाले यांच्यासाठी ई-बाईक आणि दिव्यांगांसाठी काही बाईक या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच मुक्या प्राण्यांसाठी हॉस्पिटलचंही उद्धघाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नम्रमुनी महाराज यांना मानणारे भक्तही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मी माझ्या मनात असणारा आदर व्यक्त केला”, असं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलं आहे.
“मी भाषणात बोलताना असं सांगितलं की गेल्या दीड वर्षांपासून मला घशाचा त्रास होता. यासाठी उपचार देखील सुरू होते. पण जेव्हा मी नम्रमुनी महाराज यांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला ‘ओम’चा उच्चार करण्यास सांगितलं. आम्ही गुजरातला त्यांच्या आश्रमात गेलो होतो, तेव्हा त्यांनी आमच्याकडून ‘ओम’चा उच्चार करून घेतला होता. त्यानंतर मी माझ्या घरी देखील ‘ओम’चा उच्चार करते. याचा परिणाम असा झाला की माझा आवाज चांगला झाला. त्यामुळे मी माझी भावना त्या कार्यक्रमात व्यक्त केली, असं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलं आहे.
“यामध्ये कुठंही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम केलं नाही. आम्ही स्वामी समर्थ, साईबाबा यांचे भक्त आहोत. नम्रमुनी महाराज यांना आम्ही फॉलो करतो. मग एवढ्या मोठ्या राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या बाबतीत मी कार्यक्रमावरून घरी देखील पोहोचले नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या. मला या गोष्टीची किळस येते. तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडता? जे २७ आणि २० पैसे घेऊन ट्रोल करतात त्यांच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेबाबत तुम्ही कोणत्या थराला जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? जे उबाठाचे भोंगे आहेत, संजय राऊत त्यांच्या जिभेला तर हाड राहिलेलं नाहीये”, असं म्हणत रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला.
