मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाची पुन्हा धमकी देण्यात आली आहे. त्यात महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा, तसेच शेअर बाजार इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून, शहरात १५ ऑगस्टपूर्वी स्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे.

धमकीच्या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा, तसेच काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. याशिवाय, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये आणि नागरिकांनी मेट्रोने प्रवास करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

महापौरांना यापूर्वीही दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. शुक्रवारी सकाळी आलेल्या धमकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण आहे व त्याचा उद्देश काय आहे, याचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

ई-मेलचा आयपी ॲड्रेस, तो पाठविण्यात आलेला स्रोत व प्रेषका (सेंडर) ची ओळख पटविण्यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास केला जाण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.