मुंबई : महापौर महोदया, ‘अपयशालाच आता यश म्हणून सादर केले जाते आहे का?’, ‘आपण नेमके काय साजरे करत आहोत?’ असा सवाल काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे. बेस्टच्या ताफ्यात नवीन २५०० बसगाड्या आल्याच्या घोषणेवर म्हात्रे यांनी महापौर रितू तावडे यांच्यावर ही जाहीर टीका केली आहे. ज्या बसगाड्या दोन वर्षांपूर्वी यायला हव्या होत्या त्या आज येत आहेत, असे सांगून म्हात्रे यांनी या घोषणेतील हवाच काढून टाकली आहे.
बेस्टच्या ताफ्यात नवीन २५०० इलेक्ट्रिक बस आल्या असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी समाज माध्यमांवरून केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासह त्यांनी नव्या बसगाड्यांची माहिती दिली आहे. बेस्टच्या ताफ्यात नवीन २५०० इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूकीत क्रांती झाली असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी बेस्टने एक मोठे पाऊल उचलल्याचेही महापौरांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता घालवून भाजप व शिवसेना (शिंदे) पक्षाची सत्ता आली आहे. त्यामुळे या बसगाड्यांचे श्रेय भाजपला देत महापौरांनी ही घोषणा केली आहे. मात्र, महापौरांच्या या घोषणेवर काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हटले आहे म्हात्रे यांनी…
शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मुंबईच्या रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी धावायला हव्या होत्या त्या बसगाड्या आज येत आहेत… आणि आपण त्यांचे सेलिब्रेशन करत आहोत. ज्या कंपनीला २१०० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे कंत्राट देण्यात आले ती कंपनी बसगाड्या देण्यात अपयशी ठरली. तरीही त्यांनाच पुन्हा २४०० गाड्यांचे नवीन कंत्राट देण्यात आले. पहिले कंत्राट अपूर्ण… दुसरे कंत्राट मंजूर… आणि तरीही आपण हे यश साजरे करतो आहोत, असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. हे अपयशाला दिले जाणारे बक्षीस असल्याची टीकाही म्हात्रे यांनी केली आहे. गाड्या देण्यास उशीर झाला तरीही कोणतीही दंडात्मक कारवाई नाही, कामगिरीत अपयश तरीही कोणतीही जबाबदारी नाही, तीच कंपनी आणि आणखी मोठे कंत्राट… मग आपण कोणता संदेश देतो आहोत यातून असाही सवाल म्हात्रे यांनी केला आहे.
मुंबईला दिखावा नको, कामगिरी हवी आहे कामाची मुदत पाळू नका, जबाबदाऱ्या टाळा, तरीही बक्षीस मिळेल, हाच संदेश यातून मिळत असल्याची टीका म्हात्रे यांनी केली आहे. हाच निकष असेल तर कामगिरीला काहीच महत्त्व उरत नाही. फक्त कृपादृष्टीला महत्त्व उरते. मुंबईला दिखावा नको आहे तर कामगिरी हवी आहे, अशीही टीका म्हात्रे यांनी केली आहे.
