मुंबई : होळी व धुळवड / रंगपंचमी हे सण साजरे करताना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही पार पाडण्याच्या उद्देशाने महापौर रितू तावडे यांनी ‘फुलांची होळी’ साजरी केली. या उपक्रमात वापरण्यात आलेल्या फुलांचा वापर सेंद्रिय खत निर्मितीसाठी करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. तसेच, रंगपंचमीला म्हणजेच रविवारी रंगांऐवजी फुलांचा वापर करून सण साजरा करण्याचे आवाहन तावडे यांनी मुंबईकरांना केले होते.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. स्थानिक नागरिक, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी – कामगार आदींसह त्यांनी फुलांची होळी साजरी केली. रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्यानुसार तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबविला. त्यात आमदार पराग शाह देखील सहभागी झाले. नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे शाह म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
