मुंबई : यंदा गणेशोत्सवाला पर्यावरण रक्षणाची आणि वृक्षसंवर्धनाची शाश्वत जोड देण्याच्या उद्देशाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने ‘एक गणपती, एक झाड’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. रितू तावडे यांनी स्वतःच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच महापौर बंगल्यावर शाडूच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळलेल्या मातीचा वापर करून शनिवारी रोपाची लागवड केली. तुळशी आणि सूर्यफुलाच्या रोपांची लागवड करून सर्व मुंबईकरांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी या निसर्गस्नेही उपक्रमाचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यंदा गणेशोत्सवाची शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. त्यानंतर रितू तावडे यांनी सकाळी ‘एक गणपती, एक झाड’ या उमक्रमाची अंमलबजावणी केली. भायखळा येथील महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे निवासस्थानाच्या आवारात तयार केलेल्या कृत्रिम जलकुंभात विसर्जन करण्यात आले होते. या विसर्जनानंतर संकलित शाडूची माती आणि पाण्याचा उपयोग करून महापौर बंगल्याच्या उद्यानात नवीन रोपांची लागवड करण्यात आली. गणपती मातीतून आकाराला येतो आणि पुन्हा निसर्गातच विलीन होतो. विसर्जनानंतरची ही माती आणि जल जेव्हा नवीन रोपांना संजीवनी देते, तेव्हा वर्षभर निसर्गाच्या पाना-फुलांतून आणि सावलीतून गणपतीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. ‘शब्दांपेक्षा कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी असतो,’ म्हणूनच स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली, असे रितू तावडे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील प्रत्येक नागरिकाने, सर्व इमारती, वसाहती, संकुले आणि गणेशोत्सव मंडळांनी या पद्धतीचे अनुकरण करावे आणि किमान एका रोपाची लागवड करून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नैसर्गिक वैभवाचे रक्षण हीच खरी सेवा
मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाट्या आणि नैसर्गिक तलाव हे अमूल्य वैभव आहे. त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने जागोजागी कृत्रिम तलावांची सोय उपलब्ध करून दिली होती. या कृत्रिम तलावांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आणि महानगरपालिकेला सहकार्य केले. आता मूर्ती विसर्जनानंतरही निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व हरित मुंबईच्या उभारणीसाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर तावडे यांनी केले.
एक गणपती, एक झाड’ : पर्यावरणपूरक मुंबईचा संकल्प
यंदा महानगरपालिका हद्दीत विसर्जित एकूण गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प महापौरांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने सोडला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती विसर्जनानंतर आता मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जात आहे. नागरिकांनी घरात विसर्जित केलेल्या शाडूच्या मातीचा वापर कुंड्यांमध्ये व बागांमध्ये रोपे लावण्यासाठी करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
