मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडतील ऋषिकेश येथे अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची ११७ वी बैठक ३ व ४ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत रितू तावडे परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऋषिकेशमध्ये ३ जून रोजी सकाळी १० वाजता अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची प्रमुख बैठक होत आहे. या कार्यकारी समितीच्या बैठकीस केंद्रीय गृहनिर्माण तसेच नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे नागरी विकास मंत्री रामसिंह केडा यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, देशभरातील विविध प्रमुख शहरांचे महापौर आणि उत्तराखंड राज्यातील सर्व महापौर उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे नाव परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने निश्चित केले आहे. कार्यकारी समितीद्वारे बैठकीत त्याची घोषणा केली जाईल आणि त्यानुसार तावडे या उपाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा राहणार आहे.
महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही तावडे यांनी काही दिवसांपूर्वी सूत्रे स्वीकारली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रीय पातळीवरही उपाध्यक्ष पदाचा बहुमान रितू तावडे यांना मिळाला आहे.
अखिल भारतीय महापौर परिषद ही १९६२ पासून कार्यरत आहे. नवी दिल्ली येथे संस्थेचे मुख्यालय आहे. आजघडीला देशातील विविध राज्यातील मिळून सुमारे २४० महापौर या परिषदेचे सदस्य आहेत. त्यापैकी, कार्यकारी समितीमध्ये एकूण ६० जणांचा समावेश असतो. कर्नाल (हरियाणा) शहराच्या महापौर रेणुबाला गुप्ता या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून सप्टेंबर २०२५ पासून कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. महापौरांचे एका व्यासपीठावर संघटन असावे, महापौर पदाची कर्तव्ये, अधिकार, जबाबदाऱ्या, मागण्या, लोकाभिमुख कामकाज करण्याच्या दिशेने गरजा आणि त्याचा शासनाकडे पाठपुरावा अशा विविध स्तरांवर ही अखिल भारतीय महापौर परिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते.
