मुंबई : शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अन्य आरोपींवर सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपनिश्चिती केली.आदेश देऊनही आरोपनिश्चितीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने तावडे यांना मागील सुनावणीच्या वेळी एक हजार रुपये दंड सुनावला होता. तसेच, पुढील सुनावणीलाही तावडे या गैरहजर राहिल्यास त्यांच्या नावे वॉरंट काढण्याचा आणि त्यांच्या जामिनाचे बंधपत्र रद्द करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी तावडे न्यायालयात हजर झाल्या. त्यानंतर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी तावडे यांच्यासह इतर आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार आरोपनिश्चिती केली.

ही घटना २९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील महापालिका संचालित एका उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली होती. पोलिसांच्या आरोपांनुसार, तत्कालीन नगरसेवक तावडे आणि इतर सहा जणांनी शाळेत प्रवेश केला आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका शिक्षकाच्या बदलीवरून व्यवस्थापनाशी वाद घातला. या वादादरम्यान आरोपींनी व्यवस्थापनाला शिवीगाळ केली आणि शाळेतील इतर दोन शिक्षकांवर हल्ला केला. या प्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.