मुंबई : रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशींना मुंबईतून हटवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असेल, मुंबईत विविध ठिकाणी पदपथांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशींचे जात प्रमाणपत्र आणि बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात येईल. बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्याला प्राधान्य असून प्रशासनाबरोबर पहिली सभा याच विषयावर घेतली जाईल, अशी घोषणा नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी केली. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी याबाबतची घोषणा केली.
मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर रितू तावडे यांनी आपल्या भाषणात येत्या काळात कोणती कामे करणार आणि कोणत्या कामांना प्राधान्य देणार त्याबाबत माहिती दिली. भाजपच्या वचननाम्यातील सगळ्या गोष्टींचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. पहिल्याच भाषणात त्यांनी मुंबई महापालिकेशी संबंधित अनेक विषयांबाबत घोषणा केली. मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना (शिंदे) महायुतीची सत्ता आली असून ट्रिपल इंजिन सरकार आल्यामुळे आता विकास वेगाने होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशींना मुंबईतून हटवणे हेच भाजप, शिवसेना (शिंदे) आणि आरपीआयचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. त्याकरता आम्ही डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करू. पदपथांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड शोधून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
राजावाडी रुग्णालयाचा विकास
रितू तावडे घाटकोपरमधील नगरसेविका असून आपल्या भाषणात त्यांनी राजावाडी रुग्णालयाचा दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर विकास करण्याची घोषणा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्याचा मानस असून ७५ वर्षे जेष्ठ नागरिकांसाठी ‘ऑन कॉल रुग्णवाहिका’ व ‘रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टर तपासणी’ व्हावी याकरिता उपाययोजना केल्या जातील. प्रत्येक प्रशासकीय विभागात डायलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभारण्याचा प्रयत्न असेल. ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयातून वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी उपलब्ध करून दिली जाईल. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल ,असेही त्या म्हणाल्या.
पाणीपुरवठा व पूरमुक्त मुंबई
येत्या पाच वर्षांत पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, प्रत्येक विभागात पाणी गळती शोधणारी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर बसवण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयके, तसेच मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची सूचना तावडे यांनी केली. मुंबई पूरमुक्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञान, आयआयटी आणि व्हीजेटीआय यांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येतील. येत्या पाच वर्षांत पर्जन्य जलवाहिन्यांचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपाययोजना करण्याचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
