मुंबई : जैन मुनींच्या प्रार्थनेमुळे घसादुखी बरी झाल्याचा अजब दावा केल्यानंतर महापौर रितू तावडे यांच्यावर टीकेची झोड उठली. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. जैन मुनी यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितले. त्याचा सातत्याने उच्चारण केल्यामुळे माझा घसा बरा झाला. मात्र, त्याचा उल्लेख करणे विसरले, असे स्पष्टीकरण रितू तावडे यांनी बुधवारी दिले. गेल्या दोन वर्षांपासून मी घशाच्या दुखण्यामुळे वैतागले होते. त्यांनतर जैन मुनींना भेटल्यानंतर मी त्यांना समस्या सांगितली. त्यांनतर त्यांनी प्रार्थना केली आणि माझा घशाचा त्रास बरा झाला,

असे धक्कादायक विधान महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी केले. बोरिवलीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना हा धक्कादायक दावा केला. राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापले असतानाच तावडे यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना कडवी टीका सहन करावी लागत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) संजय राऊत यांनीही तावडे यांच्या वक्तव्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, हा विषय अंधश्रद्धेचा नसून माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा आहे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, ते कोणत्याही विषयावर तथ्यहीन बोलत असतात, अशा शब्दात तावडे यांनी संताप व्यक्त केला.

ओमच्या उच्चारामुळे माझा आवाज व्यवस्थित झाला. मात्र, ओमचा उल्लेख करण्यास विसरल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संजय राऊत यांच्यावर ईडीची केस सुरू असताना त्यांची पत्नी व मुलीवर टिप्पणी झाल्यानंतर ते उफाळून उठले. मात्र, आता त्यांनी एका महिलेविषयी बोलताना मर्यादा ओलांडली. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, जैन मुनींच्या आशीर्वादामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे आणि माझे कष्ट, मेहनत आणि कर्तृत्वामुळे मी महापौरपदी बसले आहे, असे रितू तावडे म्हणाल्या. नम्रमुनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार पराग शाह, नगरसेविका राखी जाधव, धर्मेश गिरी यांच्यासह मी गुजरातला गेले होते. त्यावेळी मी महाराजांना माझ्या घशाचा त्रास सांगितला. त्यांनी आमच्याकडून ओमचा उच्चार करून घेतला. आजही मी ओमचा उच्चार करते. त्यामुळे माझ्या घशाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मंगळवारी जे वक्तव्य केले त्यामागे कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नव्हता. मात्र, त्यांनतर माझ्यावर अत्यंत वाईट पद्धतीने टीका करण्यात आली. टीका करणाऱ्यांच्या घरी आई – बहिणी आहेत की नाही, असा संतापजनक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.