Ritu Tawde On Deepika Padukone Post : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मुंबईमधील वाढत्या प्रदुषणावर नुकतीच चिंता व्यक्त करणारी एक पोस्ट केली होती. मुंबईतील खराब हवेबाबत इन्स्टावर स्टोरी ठेवत दीपिका पादुकोणने ‘मुंबईत गुदमरतंय’, श्वास घ्यायलाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हणत हे योग्य आहे का? असा सवाल विचारला होता. तसेच दीपिका पादुकोणने ही पोस्ट मुंबई महापालिकेला टॅग केली होती आणि मुंबईतील प्रदुषणाबाबतचा स्क्रीनशॉट शेअर केला होता.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने मुंबईमधील वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त केल्यानंतर याची दखल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतली आहे. महापौर रितू तावडे यांनी म्हटलं की, मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा खरोखर वाढलेला आहे. आम्ही ते नाकारत नाहीत. मात्र, योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असं माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?

“दीपिका पादुकोण या सेलिब्रिटी आहेत, त्यांनी सेलिब्रिटी म्हणून सांगितलं आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मानच आहे. आम्ही फक्त दीपिका पादुकोण यांचंच नाही तर मुंबईच्या प्रत्येक नागरिकांचं ऐकत आहोत. हा जो एअर क्वालिटी इंडेक्स (AQI)आहे हा खरोखर वाढलेला आहे. आम्ही ते नाकारत नाहीत. मात्र, त्यावर काय प्रतिबंधक उपाय केले जाणार? याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, अधिकाऱ्यांशी बोलत आहोत”, असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

“२ हजार २५० इमारतींचं बांधकाम संपूर्ण मुंबईत सुरू आहे. मुंबई मेट्रो, मुंबई महानगर क्षेत्र, पीडब्ल्यूडी अशा सगळ्यांची कामे सुरू आहेत. एकीकडे आपण बोलतो की मुंबईचा विकास झाला पाहिजे. त्या अनुषंगाने ही सर्व कामे सुरू आहेत. मात्र, तरीही या बांधकामाच्या संदर्भातील बिल्डर्स, कंत्राटदार आहेत, त्यांना मुंबई महापालिकेकडून एक नियमावली पाठवलेली आहे. हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी आपण एअर क्वालिटी इंडेक्सचे डिजिटल बोर्ड लावलेले आहेत, त्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स कोणत्या पद्धतीचा आहे, ते पाहून जर अतिशय खराब असेल तर लगेच त्यांना नोटिस बजावतो”, असंही महापौर रितू तावडे यांनी सांगितलं आहे.

“हे बिल्डर्स असो किंवा मुंबई मेट्रो, मुंबई महानगर क्षेत्र, पीडब्ल्यूडी अशा सर्वांना हे नियम लागू आहेत. या गोष्टी पाळणं अतिशय महत्वाचं आहे. आपण बिल्डर्सना असंही सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी बांधकामाच्या संदर्भातील साहित्य घेऊन जाणाऱ्या गाड्या गेल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याच्या फवारण्या देखील झाल्या पाहिजेत. मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सबाबत आम्ही सर्वच संवेदनशील आहोत”, असंही रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) म्हणजे काय?

एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI हा एक दैनंदिन आधारावर हवेच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करणारा निर्देशांक आहे. AQI द्वारे कमी वेळेत वायुप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याचे मोजमाप केले जाते. खरं तर, AQI लोकांना स्थानिक हवेच्या गुणवत्तेचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यास मदत करते. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) पाच प्रमुख वायुप्रदूषकांसाठी AQI ची गणना केली जाते. या गणनेत सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय वायू गुणवत्ता प्रमाण स्थापित करण्यात आले आहे.