मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे व पालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, महापालिका उपाहारगृहातील स्वच्छतेच्या पाहणीदरम्यान एकमेकींना जिलबी भरवून त्यांनी वादावर पडदा टाकला. महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या घोषणेच्या निमित्ताने दोघी एकत्र आल्या होत्या.
आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्यूटोरिअलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान देण्याची शिफारस करणारे महापौर रितू तावडे यांचे मार्चमधील पत्र ऑगस्टमध्ये उघडकीस आल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. संबंधित पत्र खोटे असल्याचा दावा तावडे यांनी केला होता. मात्र, ते पत्र महापौर कार्यालयाकडूनच प्राप्त झाल्याची कबुली शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली होती. त्यामुळे तावडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. ते प्रकरण शांत होते तोच भाजप नगरसेवकांच्या बैठकीत दोघींमध्ये वाद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे तावडे व शिरवडकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चांना उत आला होता.
पक्षातील अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभावाचा परिणाम पक्षाच्या वाढीसाठी योग्य नसल्याचे लक्षात घेऊन मतभेद दूर ठेवून काम करण्याची सूचना मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली होती. मात्र, त्यानंतर महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या घोषणेसाठी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषद अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चांना खतपाणी मिळत होते.
महापौरांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार शिक्षणाशी संबंधित असल्याने दोघींनाही एकत्र येणे भाग होते. अखेर गुरुवारी महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या घोषणेसाठी दोघीही एकत्र आल्या. पत्रकार परिषदेनंतर महापालिका उपहारगृहातील स्वच्छतेची त्यांनी एकत्र पाहणी केली. त्या पाहणीदरम्यान दोघींनीही एकमेकींना जिलबी भरवत सुरू असलेल्या सर्व वादाच्या चर्चांवर पडदा टाकला. तसेच, दोघींमध्ये गोडवा असून पुढेही तो कायम राहील, असे रितू तावडे म्हणाल्या.
उपाहारगृहात स्वच्छता महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहात पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा व एकंदर स्वच्छतेची महापौर तावडे व शिरवडकर यांनी खातरजमा केली. स्वयंपाकघराची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा पोशाख (हेडगिअर, ग्लोव्हज) व साठवणुकीच्या जागेवरील स्वच्छता याविषयी त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. या उपाहारगृहाबाबत जुलै २०२६ मध्ये काही तक्रारी समोर आल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून स्वच्छतेच्या कारणास्तव हे उपाहारगृह तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले होते.
आवश्यक त्या सुधारणा केल्यानंतर व त्यात सातत्य राखण्याची हमी घेतल्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये उपाहारगृह पूर्ववत सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानंतर हे उपाहारगृह पुन्हा सेवेत आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व शिक्षण समिती अध्यक्षांनी ही पाहणी केली होती. महापालिका उपहारगृहात स्वच्छतेबाबतच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
