मुंबई : मुंबईची महापौर म्हणून मला मिळणारे मानधन मी महापौर निधीला देत असून माझ्यासहीत इतर सर्व नगरसेवकांनी, मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर निधीला आर्थिक मदत करून गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेमध्ये खारीचा वाटा उचलावा,असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.

मुंबईच्या महापौर म्हणून निवड झाल्यानंतर रितू तावडे यांनी महापौर निधीत वाढ व्हावी याकरिता काही निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधीतील मदतीची रक्कम पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही महापौरांनी दिले.

नागरिकांनी पुष्पगुच्छ आणू नये…

मुंबईच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंबईकर नागरिक मोठया प्रमाणात भेटण्यासाठी शाल व पुष्पगुच्छ घेऊन येत असून याऐवजी नागरिकांनी दुर्धर आजाराने ग्रस्त गरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महापौर निधीस सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

क्यू आर कोडद्वारे मदत…

महापौर निधीस आर्थिक मदत करण्याची इच्छा असलेल्यांसाठी क्यू आर कोडची व्यवस्था करण्यात येत असून नागरिक या क्यू आर कोडद्वारे आपली आर्थिक मदत महापौर निधीस देऊ शकतात.

महापौर कार्यालयाच्या दर्शनी भागावर हे क्यू आर कोड लावण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रितू तावडे यांनी केले आहे. ह्दयविकार, मेंदूचा गंभीर आजार, किडनी विकार आणि कर्करोग यासारख्या दुर्धर रोगांनी पीडित असलेल्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना महापौर निधीमधून अर्थसहाय्य देण्यात येते. तथापि, महापौर निधीला येणाऱ्या देणग्यांचा ओघ कमी झाल्यामुळे रुग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध करण्यास मर्यादा येतात. महापौर निधीतून गेल्या अनेक वर्षांपासून गरीब रुग्णांना सरसकट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.