मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या महापौरपद भाजपकडे असले तरी अडीच वर्षांनी शिवसेना (शिंदे) पक्षाचा महापौर असेल आणि सव्वावर्षासाठी महापौरपद शिवसेना (शिंदे) पक्षाकडे असेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मुंबईच्या महापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांसाठी शिवसेनेला देण्याचे ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ‘नंदनवन’ येथे पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपकडे गेले. तर शिवसेना (शिंदे) पक्षाला उपमहापौर पद मिळाले. त्यावेळी महायुतीतील या दोन घटकपक्षांमध्ये महापौरपदाचे सूत्र कसे ठरले याबाबत काहीही स्पष्ट चित्र नव्हते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे हे चित्र स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेत सध्या भाजपच्या रितू तावडे या महापौरपदी आहेत. तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे) पक्षाचे संजय घाडी आहेत.
मधली केवळ सव्वा वर्षे शिवसेनेकडे
पहिली अडीच वर्षे भाजपकडे महापौरपद असेल. त्यानंतरच्या अडीच वर्षातील पहिले सव्वा वर्ष शिवसेना (शिंदे) पक्षाचा महापौर असेल आणि शेवटचे सव्वा वर्ष भाजपचा महापौर असेल असे सूत्र ठरल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाला सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शहरातील मोकळ्या जागा वाढविणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. महालक्ष्मी रेसकोर्सचा काही भाग सागरी किनारा मार्गाच्या मोकळ्या जागांशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या प्रकल्पाचे कामही सुरू झाले आहे. मुंबईतील नागरिकांना अधिकाधिक मोकळ्या आणि सहज उपलब्ध जागा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना (शिंदे)च्या दोन जागा वाढणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे २९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र जात पडताळणीत अन्य पक्षांचे दोन नगरसेवक बाद झाले असून त्या प्रभागात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या दोन नगरसेवकांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे दोन नगरसेवक येतील, असेही शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
