मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध गुरुवारी जामीनपात्र वॉरंट काढले.

राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. तथापि, गुरूवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी राणे हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे, माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढले. तसेच, प्रकरणाची सुनावणी २ जून रोजी ठेवताना त्यावेळी राणे यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

राणे यांनी २ जून रोजी न्यायालयात उपस्थित राहून वॉरंट रद्द करता येईल.राणेंविरुद्ध एका महिन्यात न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीनपात्र वॉरंट बजावले आहे, यापूर्वीही खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल न्यायालयाने राणे यांच्या नावे अनेकदा जामीनपात्र वॉरंट काढले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

राणे यांनी मे २०२३ मध्ये राऊत यांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे उद्धव ठाकरेंना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा आरोप केला होता. त्यानंतर, राज्यसभा खासदार राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती व बदनामीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.