मुंबई : घाटकोपरमधील झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या ३७ बांधकामांचे मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाने शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी निष्कासन केले.मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
घाटकोपर (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेल्या ३७ बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले.
