मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांची देखभाल-दुरूस्तीसाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. तर, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक असेल.
मध्य रेल्वे
मुख्य मार्गिका
कुठे : सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान अप – डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर त्या डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवरील थांबतील.
हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप – डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या डाऊन लोकलही रद्द करण्यात येतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप सेवा; तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकलही बंद असतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान
परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. याव्यतिरिक्त, या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर चर्चगेटला जाणाऱ्या काही लोकल वांद्रे आणि दादर स्थानकांवरच थांबवून तेथून परत पाठवल्या जातील.
