मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात शनिवारी आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ब्लाॅक काळात चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यानची लोकल सेवा बंद असणार आहे. तर, मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना पर्यायी मार्गाने इतर स्थानकांतून इच्छित स्थळी प्रवास करावा लागणार आहे. तर, पश्चिम रेल्वेच्या ब्लाॅकमुळे काही लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.

मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल

भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरवरून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील. ब्लाॅक कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द करण्यात आला आहे.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल

चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : मरीन लाइन्स स्थानकादरम्यान सर्व मार्गिकावर

कधी : शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ दरम्यान

परिणाम : मरीन लाईन्स स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ दरम्यान रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाच्या तुळई उभारण्यात येणार आहेत. ब्लाॅकमुळे काही लोकल

अंशत: रद्द आणि काही लोकल सेवा पूर्णत: रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीहून शनिवारी रात्री १२.१० वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंत धावेल. त्यामुळे या लोकलची सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान उपलब्ध नसेल. रात्री ११.४९, रात्री १२.०५ ची विरार – चर्चगेट लोकल, रात्री १२.३० बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. पहाटे ४.२५ चर्चगेट – विरार, पहाटे ४.२८ चर्चगेट – बोरिवली लोकल मुंबई सेंट्रलवरून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही.