मुंबई….मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असणाऱ्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेला वाहतूक सेवेत दाखल होऊन रविवारी (८ जून) १२ वर्षे पूर्ण झाली असून या १२ वर्षांत या मार्गिकेच्या १५ लाखांहून अधिक फेऱ्या झाल्या. एकूण १२५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ९९.९९ टक्के वक्तशीरपणा आणि शून्य अपघाती मृत्यू ही मेट्रो १ मार्गिकेची वैशिष्ट्ये ठरली आहेत. ११.४ किमीचा मार्गिका मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून १४ मेट्रो मार्गिकांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या मेट्रो प्रकल्पातील पहिली मार्गिका घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी होती. या मार्गिकेच्या कामाला २००८ मध्ये सुरुवात झाली आणि २०१४ मध्ये काम पूर्ण होऊन मुंबईतील पहिली मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली.
११.४ किमीची आणि १४ स्थानकांचा समावेश असलेली मेट्रो १ मार्गिका ८ जून २०१४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाली. मुंबईत पहिल्यांदा मेट्रो धावली आणि मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू झाला. सुरुवातीला या मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळूहळू या मार्गिकेकडे प्रवासी वळू लागले आणि आज या मार्गिकेवरून दिवसाला अंदाजे पावणेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या इतकी आहे की, गर्दीच्या वेळेस चार डब्यांची मेट्रो गाडी अपुरी पडत आहे. त्यामुळे या मार्गिकेवर सहा डब्यांची मेट्रो गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)कडून सहा डब्यांची मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र आर्थिक अडचणींमुळे सहा डब्यांची मेट्रो प्रत्यक्षात उतरत नसल्याचे चित्र आहे.
मेट्रो १ मार्गिका सेवेत दाखल होऊन रविवारी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या १२ वर्षांत या मार्गिकेवरून १५ लाख फेऱ्या धावल्या असून यातून १२५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. या काळात मेट्रो १ चा ९९.९९ टक्के वक्तशीरपणा राहिला आहे. तर मार्गिकेवर छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत, मात्र एकही अपघाती मृत्यू झालेला नाही. या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांच्या सुविधेसाठी एमएमओपीएलने १२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ऑन द गो कार्डचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत प्रवाशांना मेट्रो १ मार्गिकेसह मेट्रो २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली), मेट्रो ३ (आरे ते कफ परेड), बेस्ट बस आणि मोनोरेलचा प्रवासही करता येणार आहे.
