लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील पहिल्या ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेची उभारणी करणारी आणि या मार्गिकेचे संचालन करणारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. कर्जाचा डोंगर आणि दिवाळखोरीच्या कचाट्यात अडकलेल्या या कंपनीने आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारी पाठबळ असलेल्या नॅशनल ॲसेट रीकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडशी (एनएआरसीएल) २,७७१.३२ कोटी रुपयांच्या कर्ज पुनर्रचनेसंबंधी करार केला होता. मात्र हा करार फिस्कटला आहे.

करारासाठी आयआयएफसीएल यूके यांची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने करार फिस्कटला आहे. त्यामुळे एमएमओपीएल पुन्हा दिवाळखोरीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मेट्रो १ मार्गिकेवर सहा डब्यांची मेट्रो गाडी सुरू करण्यासाठीही आता विलंब होणार आहे.

मुंबईतील पहिल्या ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेची उभारणी ‘एमएमओपीएल’कडून करण्यात आली आहे. ही मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली असून या मार्गिकेचे संचालनही याच कंपनीकडून केले जाते. या कंपनीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ७४ टक्के, तर ‘एमएमआरडीए’चा २६ टक्के हिस्सा आहे. ही मार्गिका आजघडीला मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाची आणि दिवसाला पाच लाख प्रवासी संख्या असलेली मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळे या मार्गिकेचे संचालन अखंडित सुरू राहणे अत्यावश्यक आहे. मात्र, ‘एमएमओपीएल’ मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे.

कंपनीवर कर्जाचा मोठा डोंगर असून ती दिवाळखोरीच्या कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या अखंडित संचालनाविषयीही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. जुलैमध्ये एमएमओपीएलला दिलासा मिळाला होता. ‘एमएमओपीएल’ आणि ‘एनएआरसीएल’ यांच्यात २,७७१.३२ कोटी रुपयांच्या कर्ज पुनर्रचनेसंबंधी जुलैमध्ये करार करण्यात आला. या कर्ज पुनर्रचना करारानुसार ‘एनएआरसीएल’ला ‘एमएमओपीएल’च्या संचालक मंडळावर एक संचालक नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आला होता. तसेच कर्जदाते आणि कंपनीच्या प्रतिनिधींची संयुक्त देखरेख समिती स्थापन करण्यात येईल आणि ही समिती कर्ज पुनर्रचना प्रक्रियेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल, असे करारात नमूद करण्यात आले होते. कर्ज पुनर्रचना करारामुळे ‘एमएमओपीएल’वरील ११०० कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जाचा बोजा दूर होणार होता, तर दिवाळखोरीची प्रक्रिया मागे घेता येणार होती. मात्र आता या कर्ज पुनर्रचनेचा करार फिस्कटला आहे. या करारासाठी दुसऱ्या कर्जदात्या आयआयएफसीएल यूकेची मंजुरी आवश्यक होती. मात्र ही मंजुरी मिळाली नसल्याने करार फिस्कटला.

एमएमओपीएलने २९ सप्टेंबरला मुंबई शेअर बाजार आणि सेबीला कर्ज पुनर्रचना करार अयशस्वी झाल्याची माहिती एका निवेदनाद्वारे दिल. तर आयआयएफसीएल यूकेने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) धाव घेऊन कंपनीला कर्जफेड करण्यास असमर्थ घोषित करण्यासाठी नव्याने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे एमएमओपीएलसमोरील अडचणी वाढल्या असून कंपनी दिवाळखोरीत गेल्यास मेट्रो १ चे संचालनही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गिकेवर चार डब्यांऐवजी सहा डब्यांची मेट्रो चालविण्याची प्रक्रिया एमएमओपीएलने सुरू केली होती. मात्र आता दिवाळखोरीची टांगती तलवार असल्याने अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध होणार नसल्याने सहा डब्यांची मेट्रो गाडी सुरू करणेही आता शक्य नाही. याविषयी एमएमओपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता आपण रजेवर असल्याचे सांगत त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.