मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) मोठा दिलासा दिला आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांना आता व्हॉट्सॲपवर पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रिप पास व स्टोअर व्हॅल्यू पास खरेदीची सुविधा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात आल्याने आता प्रवाशांना पाससाठी तिकीट खिडकीच्या रांगेत उभे राहण्याची वा ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. प्रवाशांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थेट मेट्रो पास खरेदी, साठवून ठेवणे आणि त्याचा वापर करणे शक्य होईल.
मुंबईतील पहिली मेट्रो म्हणून ओळख असलेल्या मेट्रो १ ला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला या मार्गिकेवरून अंदाजे साडेपाच लाख प्रवासी प्रवास करतात. अशावेळी या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमओपीएलकडून प्रवाशांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच भाग म्हणून आता एमएमओपीएलने प्रवाशांच्या सोयीसाठी पासची सुविधा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिली आहे.
डिजिटल पासमुळे प्रवाशांना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने मेट्रो पास खरेदी करून सोबत ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. हा डिजिटल पास गुगल वॉलेट वा ॲपल वॉलेटमध्येही जोडता येणार असून, मोबाइल फोनवरून तो सहज वापरता येईल. या सुविधेत प्रवाशांना ट्रिप पास व स्टोअर व्हॅल्यू पास असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
ट्रिप पासमध्ये ठरावीक संख्येच्या प्रवासांचे आगाऊ बुकिंग करता येते. तर स्टोअर व्हॅल्यू पासमध्ये प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार रक्कम जमा करता येईल व प्रत्येक प्रवासासाठी लागू असलेले भाडे त्यातून आपोआप वजा केले जाईल. व्हॉट्सॲप पास सुविधेमुळे प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची किंवा तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज आता लागणार नाही.
सुविधेचा लाभ
प्रवाशांना मुंबई मेट्रो वनच्या ९६७०००८८८९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर इंग्रजीत ‘Hi’ असा संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यासाठी ‘Book Now’ वर क्लिक करावे लागेल. पुढे ‘Digital Pass’ हा पर्याय निवडून त्यानंतर ‘Trip Pass’ किंवा ‘Store Value Pass’ यापैकी एक पर्याय निवडावा. यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर डिजिटल पास तत्काळ मिळेल. ही संपूर्ण प्रक्रिया व्हॉट्सॲपवरूनच पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी नवीन ॲप डाउनलोड करण्याची, स्वतंत्र खाते तयार करण्याची वा तिकीट खिडकीवर जाण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पास उपलब्ध करून देणारी मेट्रो १ ही देशातील पहिली मार्गिका असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमओपीएलने केला आहे.
