मुंबई: दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लवकरच खानपानाची सोय उपलब्ध होणार आहे. तर कपड्यांसह इतर प्रकारच्या खरेदीपासून मेट्रो स्थानकात रात्रीचा मुक्कामही करता येणार आहे. दोन मेट्रो स्थानकांतील व्यावसायिक जागांच्या वापरासाठीच्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३९ जागांसाठी १८ कंपन्यांनी ६८ बोली लावून व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. आता निविदा अंतिम करून लवकरात लवकर स्थानकातील दुकाने सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तिकीट विक्रीव्यतिरिक्त इतर माध्यमातूनही महसूल मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो स्थानकांतील जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकांतील जागांचा व्यावसायिक वापर करून त्यातून महसूल मिळविण्यासह प्रवाशांना खानपानासह खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हाही उद्देश आहे. एमएमआरडीएच्या निर्णयानुसार एमएमएमओसीएलने दोन मेट्रो मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांतील जागांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी एमएमआरडीएने इच्छुक कंपन्यांकडून काही दिवसांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती एमएमएमओसीएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमएमओसीएलच्या निविदेनुसार ३० सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना बोली लावता येणार होती. ही मुदत संपुष्टात आली. ३९ जागांच्या व्यावसायिक वापरासाठीच्या निविदेला १८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून ६८ बोली लावल्या आहेत. मेट्रो स्थानकातील किऑस्क आणि इतर व्यावसायिक जागांसाठी बोली लावण्यात आली आहे. अंदाजे २० हजार चौ. फूट जागांच्या व्यावसायिक वापरासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १३ व्यावसायिक जागा आणि २६ किऑस्कसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर अनेक बोलीदारांनी एकापेक्षा अधिक जागांसाठी बोली लावल्याने बोलीदारांमध्ये स्पर्धा असणार आहे.
लवकरच निविदा अंतिम करून पात्र बोलीदारांना जागेचे वितरण केले जाणार असून त्यानंतर त्यांच्याकडून पुढील कार्यवाही करून उपलब्ध जागेचा प्रत्यक्ष वापर सुरू केला जाणार आहे. या जागेचा वापर कार्यालयीन जागेपासून ते कपड्यांची दुकाने, रिटेल दुकाने, दागिने-अलंकाराची दुकाने, मॅकडोनाल्ड्ससह इतर दुकानांचा यात समावेश असणार आहे. इतकेच नव्हे तर पॉड हॉटेल्सची स्थानकांवर उभारणी केली जाणार आहे. जिथे पर्यटकांना, कामानिमित्त मुंबई येणाऱ्यांना विश्रांती घेता येणार असून रात्रीच्या मुक्कामाचीही सोय या पॉड हॉटेलमध्ये असणार आहे. खानपान ते खरेदी आणि त्याचवेळी स्थानकात मुक्कामाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
