मुंबई : दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचे तिकीट आता उबर ॲपवरही उपलब्ध करण्यात आले आहे. तर उबर ॲपवरून तिकीट काढल्यास प्रवाशांना तिकीट दरात १० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचे संचलन महा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमएमओसीएल) केले जाते. या मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या वाढावी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमएमओसीएलसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, कागदविरहीत तिकीटांचा वापर वाढावा या उद्देशाने एमएमएमओसीएलकडून अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई वन ॲपद्वारे प्रवाशांना ई-तिकीट उपलब्ध करण्यात आले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरून दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट काढणे सोपे व्हावे यासाठी तिकीट विविध ॲपवरूनही उपलब्ध करून दिले जात आहे. तर आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे (ओएनडीसी) उबर ॲपवरूनही मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

ओएनडीसीद्वारे याआधी यात्री, ईएमटी, वन तिकीट, चलो, रेड बस, इक्सिगो, नवी, टम्मोक, ट्रिपोझो, ऑटोपी, मॅजिकपिन, हायवे डिलाईट, पेलोकल प्लॅटफॉर्मवर मेट्रो २ अ आणि ७ चे तिकीट उपलब्ध करण्यात आले आहे. तर कन्फर्म तिकट, ईज माय ट्रीप, रेड रेल, व्होडाफोन आयडिया आणि व्हॉट्स ॲपद्वारेही या दोन्ही मार्गिकांचे तिकीट उपलब्ध आहे. त्यात आता उबर ॲपचीही भर पडली आहे. उबेर ॲपवरून तिकीट काढल्यास १० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. दरम्यान, मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द) आणि मेट्रो ९ (दहिसर – मिरा-भाईंदर) मार्गिकेतील पहिला टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याचे तिकीटही उबरसह अन्य ॲपवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.