मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याने मागील १५ मिनिटांपासून मांडपेश्वर स्थानकावर गाडी खोळंबली आहे. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, यामुळे ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील सेवेला फटका बसला आहे. सध्या मेट्रो गाड्या अंधेरी पश्चिम – डहाणूकर वाडीदरम्यान धावत आहेत.
‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवर सकाळी ११ च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला आणि मेट्रो गाडी अचानक मांडपेश्वर मेट्रो स्थानकात थांबली. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे काम एमएमएमओसीएलकडून तातडीने हाती घेतले असले तरी या कामास काही वेळ लागणार आहे.
परिणामी, एमएमएमओसीएलने सेवा अखंडित ठेवण्यासाठी काही बदल केले आहेत. त्यानुसार, सध्या डहाणूकरवाडी – दहिसर पूर्व दरम्यान एकाच मार्गिकेवर (सिंगल लेन) दोन्ही दिशांनी मेट्रो सेवा सुरू आहे. तर अंधेरी पश्चिम – डहाणूकरवाडीदरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती एमएमएमओसीएलकडून देण्यात आली.
Technical glitch near Dahisar Metro @MMMOCL_Official is fixing.pic.twitter.com/2agyGOrfSY
— Mumbai Metro City ? (@MumbaiMetroCity) July 4, 2026
मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याबद्दल एमएमएमओसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे. तर तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील सेवा पूर्ववत केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
