मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – दहिसर पूर्व मेट्रो २ अ’ आणि ‘अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व मेट्रो ७’ मार्गिकेवरील मोकळ्या जागा भाड्याने देण्याचा निर्णय महा मुंबई मेट्रो संचालन मंडळाने (एमएमएमओसीएल) घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून खाद्यपदार्थ, किरकोळ विक्री, सेवा व्यवसाय आणि इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी जागा भाड्याने देण्यात येणार आहेत. जागा भाड्याने देऊन तिकीट विक्रीव्यतिरिक्त अन्य पर्यायाद्वारे अधिकाधिक महसूल मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पांतील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका २०२२ पासून टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल झाल्या. या दोन्ही मार्गिका आज पूर्ण क्षमतेने धावत आहेत. या मार्गिकांना सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता या मार्गिकांना प्रतिसाद वाढत आहे. पण अपेक्षित प्रवासी संख्या या मार्गिकांनी अद्यापही गाठलेली नाही. त्यामुळे आता तिकीट विक्रीव्यतिरिक्त इतर पर्यायांद्वारे महसूल मिळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा भाड्याने देणे, स्थानकावर आणि परिसरात जाहिरातींचे हक्क देणे, मेट्रो स्थानकांच्या नावांचे ब्रँडिंग करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करणे या पर्यायांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार मेट्रो स्थानकांतील मोकळ्या जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमएमएमओसीएलने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत.
या मेटो स्थानकांवर मिळणार सुविधा
– अंधेरी पश्चिम, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, बांगूर नगर, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वलनाई, डहाणूकरवाडी यासह अन्य मेट्रो स्थानकांवरील जागा भाड्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
– मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा खाद्यपदार्थांचे स्टॉल, किरकोळ विक्री दालने आणि एटीएमसारख्या सुविधांसाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्यात येणार आहे. खासगी कंत्राटदारांना मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत.
– निविदेनुसार ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील लहान, मध्यम आणि मोठ्या किऑस्कसह ब्लॉक स्पेसच्या जागा भाड्याने दिल्या जाणार आहेत. काही स्थानकांवर २,२०० चौरस फुटांपर्यंतच्या मोठ्या जागाही उपलब्ध आहेत. – यातील ब्लॉक स्पेससाठी १५ वर्षांचा परवाना कालावधी देण्यात येणार आहे. त्यात आणखी ५ वर्षांची वाढ करता येणार आहे. किऑस्क जागांसाठी ५ वर्षांचा परवाना असेल. त्यालाही पुढे ५ वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे.
