मुंबई: ‘अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याला अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली आहे. मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)च्या पथकाने नुकतेच या स्थानकाचे तांत्रिक परीक्षण केले असून आता सीएमआरएसचे पथक पुढील आठवड्यात येऊन इतर चाचण्या करणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या स्थानकास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि हे स्थानक प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे आता लवकरच चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

‘मेट्रो २ ब’ मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने काम सुरू

एमएमआरडीएने २३.६४ किमी लांबीच्या ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेचे तीन टप्प्यात काम हाती घेतले आहे. ही मार्गिका मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही मार्गिका पूर्व उपनगरांना थेट पश्चिम उपनगरांशी जोडून प्रवास अतिजलद करणार आहे. तर ही मार्गिका ‘मेट्रो २ अ’ (अंधेरी पश्चिम – दहिसर) आणि ‘मेट्रो ९’ (दहिसर – मिरा-भाईंदर) मार्गिकेचा विस्तार आहे. त्यामुळे ‘मेट्रो २ ब’ पूर्ण क्षमतेने धावू लागल्यास मानखुर्दवरून मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

या मार्गिकेतील मंडाले – मानखुर्ददरम्यानचा टप्पा ८ एप्रिलला सेवेत दाखल झाला. या टप्प्याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. हा टप्पा पाच स्थानकांचा असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच एमएमआरडीएने ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – सारस्वत नगर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर स्थानक मेअखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या स्थानकाच्या कामाला वेग दिला आणि स्थानकाचे कामही पूर्ण केले. काम पूर्ण झाल्याने या स्थानकाच्या संचालनासाठी शेवटच्या प्रक्रियेस सुरुवात केली. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात एमएमआरडीएने या स्थानकासाठी सीएमआरएसकडून चाचण्या पूर्ण करून घेण्यासाठी आणि सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज केला.

मेट्रो-मोनोरेलची जोडणी

या अर्जानुसार नुकतीच सीएमआरएसच्या पथकाने चेंबूर मेट्रो स्थानकाचे तांत्रिक निरीक्षण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तांत्रिक निरीक्षण झाल्याने आता पुढील चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात सीएमआरएस पथक मुंबईत दाखल होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. चेंबूर स्थानकाची सुरक्षा चाचणी आता पुढील आठवड्यात होणार असल्याने लवकरच या स्थानकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. त्यामुळे मे अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यात चेंबूर स्थानक वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मंडाले – चेंबूर अशी मेट्रो धावेल आणि चेंबूरला पोहोचणे सोपे होईल.

महत्त्वाचे म्हणजे चेंबूर मेट्रो स्थानक आणि व्ही. एन. पुरव मोनोरेल स्थानक पादचारी पुलाने जोडण्याचे काम सुरू आहे. हा पादचारी पूल सेवेत दाखल झाल्यास आणि मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल झाल्यास मेट्रोतून मोनोरेलमध्ये आणि मोनोरेलमधून मेट्रोत जाणे सोपे होणार आहे. मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी झाल्यास दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी संख्या वाढेल, अशी आशाही एमएमआरडीएला आहे.