मुंबई : अंधेरी पश्चिम ते मंडाले-मानखुर्द मेट्रो २ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाच्या संचालनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या स्थानकासाठीच्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस), दिल्ली यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून स्थानकाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हे स्थानक सुरू झाल्यास मंडाले-मानखुर्द परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
५.६ किमीचा टप्पा सेवेत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पांपैकी २३.६४ किमी लांबीच्या मेट्रो २ब मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. मेट्रो २ब या उन्नत मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार असून या उपनगरांमधील प्रवास अतिजलद होणार आहे. या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत असून मंडाले – डायमंड गार्डन, डायमंड गार्डन – सारस्वत नगर आणि सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असे हे तीन टप्पे आहेत. यातील मंडाले ते डायमंड गार्डन हा ५.६ किमीचा पहिला टप्पा ८ एप्रिल रोजी सेवेत दाखल झाला. मात्र, या टप्प्याला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. हा टप्पा कमी अंतराचा असल्याने प्रवासी प्रतिसादाबाबत एमएमआरडीएला सुरुवातीपासूनच साशंकता होती. त्यामुळे पहिला टप्पा सुरू करतानाच चेंबूर मेट्रो स्थानक शक्य तितक्या लवकर सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चेंबूर हा महत्त्वाचा आणि वर्दळीचा परिसर आहे. हा परिसर मेट्रोने जोडला गेल्यास प्रवासी संख्या वाढेल, या उद्देशाने एमएमआरडीएने स्थानकाच्या कामाला वेग दिला. काम पूर्ण झाल्यानंतर सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आणि आता त्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत.
सीएमआरएस चाचण्या यशस्वी झाल्याने या स्थानकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने स्थानकाच्या संचालनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे हे स्थानक आता आठवड्याभरात सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानक सेवेत दाखल झाल्यानंतर मंडाले ते चेंबूर हा प्रवास मेट्रोने करता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोनेरेलही सुरू होणार
चेंबूर मेट्रो स्थानक नजीकच्या व्हीएनपी आणि आरसीसी मार्ग मोनोरेल स्थानक थेट पादचारी पुलाने जोडले जाणार आहे. लवकरच मोनोरेलही सेवेत दाखल होणार आहे. किंबहुना चेंबूर मेट्रो स्थानक आणि मोनोरेल एकाच दिवशी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मोनोरेलमधून मेट्रोत आणि मेट्रोतून मोनोरेलमध्ये जाणे शक्य होणार आहे. मोनोरेल-मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. मंडालेवरून पुढे जेकब सर्कलपर्यंतचा प्रवास मेट्रोने आणि पुढे मोनोरेलने करता येणार आहे. त्यामुळे ही बाबी प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
