मेट्रो २ब : मध्य रेल्वे मार्गावर १७८ टन वजनाच्या स्टील स्पॅनची उभारणी लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २बी मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पार केला आहे. कुर्ला ते टिळक नगर रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर १७८ टन वजनाच्या स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. हा टप्पा पार केल्याने चेंबूर ते सारस्वत नगर या मेट्रो २बी मार्गिकेतील तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार आहे.
हैदकाबाद येथे स्पॅनची निर्मिती
एमएमआरडीएकडून २३.६४३ किमी लांबीच्या मेट्रो २बी मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे.डायमंड गार्डन ते मंडाले हा ५.७ किमी लांबीचा पहिला टप्पा ८ एप्रिलला सेवेत दाखल झाला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काम सध्या सुरू आहे. अशात आता तिसऱ्या टप्प्याच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा एमएमआरडीएने यशस्वीपणे पार केला आहे. कुर्ला ते टिळक नगर रेल्वे स्थानक मार्गावर १७८ टन वजनाचा आणि ४१.५ मीटर लांबीचा स्टील स्पॅन यशस्वीपणे उभारण्यात आला आहे.
कुर्ला पूर्व परिसरात खांब क्रमांक पी ६६३ ते पी ६६४ दरम्यान सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गिका ओलांडणारा रेल्वे ओव्हरब्रिज असा हा स्पॅन आहे. या स्पॅनची रुंदी ११ मीटर असून १७८ टन वजनाचा स्पॅन हैदराबाद येथील विशेष सुविधा केंद्रात तयार करून मुंबईत आणण्यात आला. मुंबईत प्रकल्पस्थळी स्पॅन दाखल झाल्यानंतर त्याची जोडणी करून स्पॅन उभारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग
स्पॅनच्या उभारणीकरिता रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक मिळाले होते. त्यानुसार निर्धारित ब्लॉक कालावधीत स्पॅन बसविण्यात आला आहे. या कामासाठी ५०० टन क्षमतेच्या टायर-माउंटेड क्रेन्सचा वापर करण्यात आला आहे. तर ५०० टन वजनाच्या दोन क्रेन्स अतिरिक्त ठेवण्यात आल्या होत्या. या स्पॅनच्या उभारणीमुळे आता चेंबूर ते सारस्वत नगर या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार आहे. हा टप्पा १०.३ किमी लांबीचा असून यात आठ स्थानकांचा समावेश आहे.वांद्रे, आयटीओ, आयएलअँडएफएस, एमटीएनएल, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग आणि चेंबूर अशी ही आठ स्थानके आहेत.
दरम्यान हा तिसरा टप्पा पूर्ण होऊन तो सेवेत दाखल होण्यासाठी २०२७ उजाडणार आहे. मात्र या टप्प्यातील एकमेव चेंबूर स्थानक मात्र येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होणार आहे. मोनोरेल आणि मेट्रो २बी मार्गिकेची जोडणी करून मेट्रो-मोनोरेल मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चेंबूर स्थानकाचे काम पूर्ण झाले असून आता लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
