Mumbai Metro 2B: Mandale to Chembur Service: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा आणि अधिकाधिक प्रवाशांना मेट्रोचा वापर करता यावा यासाठी आता एमएमआरडीएने एप्रिलपर्यंत चेंबूर मेट्रो स्थानक पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या स्थानकाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. तेव्हा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर काही दिवसाने एकमेव चेंबूर स्थानक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून मंडाले ते चेंबूर अशी मेट्रो धावणार आहे.
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेचा विस्तार मेट्रो २ ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २३.६ किमीची ही मेट्रो मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार डायमंड गार्डन ते मंडाले असा ५.३९ किमी लांबीचा पहिला टप्पा, डायमंड गार्डन ते स्वारस्वत नगर दुसरा टप्पा आणि सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असा तिसरा टप्पा या मार्गिकेत असणार आहे. या तीन टप्प्यापैकी डायमंड गार्डन ते मंडाले या पहिल्या टप्प्याचे काम २०२५ मध्येच पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला.
मात्र केवळ लोकार्पणासाठी वेळ मिळत नसल्याने पूर्व उपनगरवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात लोकार्पण होईल असे सांगितले जात आहे, मात्र अद्यापही तारीख निश्चित नाही. असे असताना आता एमएमआरडीएने या मार्गिकेमध्ये येत्या काही दिवसांतM चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश डायमंड गार्डन ते सारस्वत नगर या दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. हा टप्पा सेवेत दाखल होण्यासाठी बराच वेळ आहे. हा टप्पा २०२७ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. अशावेळी डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा सेवेत दाखल होत असताना पूर्व उपनगरातील अत्यंत महत्त्वाच्या अशा चेंबूरला जोडणारे मेट्रो स्थानक सेवेत दाखल होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. चेंबूर स्थानक सेवेत दाखल झाल्यास या टप्प्याला प्रतिसाद वाढेल असे म्हणत आता एमएमआरडीएने चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये चेंबूर मेट्रो स्थानक कार्यान्वित होईल आणि मंडाले ते चेंबूर अशी मेट्रो धावेल अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चेंबूर मेट्रो स्थानक एप्रिलपर्यंत सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने कामास वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत या स्थानकाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करून या स्थानकावरील मेट्रो संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत एप्रिलमध्ये हे स्थानक सेवेत दाखल केले जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे चेंबूर ते मंडाले प्रवास काही मिनिटात करणे शक्य होणार आहे.

