मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवार, २ नोव्हेंबरपासून आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या मार्गिकेवरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन कामकाजाच्या दिवशी, सोमवार ते शुक्रवारदरम्यान ४६ अतिरिक्त मेट्रो गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या मेट्रो गाड्यांची वारंवारता सुधारणार असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.
एमएमआरसीकडून मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन केले जात ही मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली आहे. आरे-बीकेसी, बीकेसी-आचार्य अत्रे चौक मार्ग आणि आचार्य अत्रे चौक-कफ परेड असे हे तीन टप्पे होते. ही मार्गिका ऑक्टोबर २०२५ पासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. आरे-कफ परेड अशी पूर्ण क्षमतेने मेट्रो ३ मार्गिका धावू लागल्यानंतर या मार्गिकेला प्रतिसाद वाढू लागला आहे.
या मार्गिकेवरून आजघडीला अडीच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तर यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एमएमआरसीने सोमवार, २ नोव्हेंबरपासून या मार्गिकेवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. कामकाजाच्या दिवशी, सोमवार ते शुक्रवारदरम्यान मेट्रो गाड्यांच्या ४६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांमुळे दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करणेही अधिक सोपे होणार आहे.
प्रवासी संख्या सातत्याने वाढत असताना या मार्गिकेवरील वारंवारता ४ मिनिटे ५० सेकंद अशी होती. ही वारंवारता ४ मिनिटे २५ सेकंद आणण्यासाठी गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या प्रवासी संख्येच्या अनुषंगाने वर्षभरात अनेकदा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
त्यामुळेच २३ जून २०२६ रोजी फेऱ्यांची संख्या २८२, तर २८ सप्टेंबर २०२६ रोजी २९१ करण्यात आली. आता आणखी ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी ही संख्या ३३७ वर पोहोचली आहे. या वाढत्या फेऱ्यामुळे मेट्रो गाड्यांची वारंवारता सुधारून प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
