मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने उभारलेल्या ॲक्वा लाईन म्हणजेच ‘मुंबई मेट्रो – ३’ प्रकल्पाच्या नियोजनावर प्रवाशांकडून टीका केली जात आहे. ॲक्वा लाईनच्या प्रवेशद्वारांवर खाली जाण्यासाठी सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच प्रवेशद्वार व उद्वाहक यांच्यातील अंतरामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव पायऱ्यांचा पर्याय अवलंबावा लागतो. शिवाय, प्रवेशद्वारांवर उभारलेले सरकते जिने अनेकदा बंद असल्याने प्रवाशांना पायऱ्या चढाव्या लागतात. परिणामी, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होत आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ‘मुंबई मेट्रो – ३’ ही शहरातील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या मार्गिकेचे संचलन-देखभालीची जबाबदारीही एमएमआरसीवर आहे. वेगवान प्रवास, वातानुकूलित मेट्रो, स्थानके, डिजिटल तिकीट यंत्रणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर झाला. मात्र, तांत्रिक अडचणी आणि इतर कारणाने सेवा विस्कळीत होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांची अधूनमधून गैरसोय देखील होत असते. मेट्रो स्थानकांवर वर आणि खाली जाण्यासाठी दोन स्वतंत्र सरकते जिने आणि बाजूला पायऱ्या असणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात स्थानकांमध्ये पायऱ्या आणि केवळ वर येण्यासाठी एकच सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध आहे. काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे तोही सरकता जिना बंद असतो. अन्य काही स्थानकांत देखील सारखीच स्थिती असते. त्यामुळे पायऱ्या चढताना प्रवाशांची पूर्णतः दमछाक होते. काही दिवसांपूर्वी चर्चगेट मेट्रो स्थानकातील उद्वाहकही अचानक बंद पडून त्यात सहा प्रवासी अडकल्याची घटना घडली होती. त्यावेळीही मेट्रो प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला होता. अशातच मुख्य प्रवेशद्वार आणि उद्वाहक यांच्यातील अंतराचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे.

प्रत्यक्ष प्रवासी संख्या केवळ ११ टक्के

शितलादेवी मेट्रो स्थानकात ए १ आणि बी ३ प्रवेशद्वारावर उद्वाहक आहेत. स्थानकात वर जाण्यासाठी सरकत्या जिन्यांची सुविधा आहे. मात्र, खाली जाण्यासाठी ती सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानकातून बाहेर पडताना ज्येष्ठ नागरिकांसमोर पायऱ्यांचाच पर्याय उरतो. दुसरीकडे, उद्वाहक वापरायचा झाल्यास स्थानकापासून रस्ता ओलांडून तब्बल १२० किंवा १९० मीटरचे अंतर पार करावे लागते.

– ॲक्वा लाईन सुरू करताना दररोज १७ लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये ॲक्वा लाईनवर दररोज सरासरी केवळ १.८८ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे समजते. म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रवासी संख्या केवळ ११ टक्के राहिली. दररोजची १.८८ लाखांची प्रवासी संख्या ही सुमारे १८८ बेस्ट बसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीइतकी असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी केली.

– ॲक्वा लाईनचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केले आहे. काही स्थानकांची नावे आणि प्रत्यक्ष स्थान यांच्यात तफावत आहे. स्थानकांची नावे आणि त्यांचे प्रत्यक्ष स्थान यांचा मेळ नसल्याने प्रवाशांची दिशाभूल आणि गैरसोय होते. नियोजनाच्या अभावामुळे एमएमआरसीला प्रवासी संख्येचे उद्दिष्ट देखील गाठता आलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

एमएमआरसीचे म्हणणे काय?

जागेची उपलब्धता आणि गरजेनुसार ॲक्वा लाईनच्या (मुंबई मेट्रो-३) स्थानकांवर स्थानकाची रचना आणि उद्वाहक व सरकत्या जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर व्हीलचेअर वापरणारे प्रवासी तसेच शारीरिक व्याधी असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी किमान दोन उद्वाहकांची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यास मर्यादा येत असल्या तरी प्रवाशांच्या सुलभतेसाठी कार्यपद्धतीत बदल करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. तसेच, तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी अतिरिक्त सरकते जिने बसविण्याचाही विचार केला जाऊ शकतो