मुंबई : गणेशोत्सवादरम्यान नागरिक, भाविकांना रात्री उशिरा घरी वा इच्छितस्थळी पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ‘मेट्रो ३’मधून मध्यरात्री १२ पर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच ‘मेट्रो ३’मधून लहान गणेशमूर्ती नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या गणेशमूर्तीची तपासणी केल्यानंतरच मेट्रोतून नेता येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिकांच्या फेऱ्या वाढवाव्यात वा सेवा कालावधी वाढवावा, अशी मागणी राजकीय पक्षांकडून होत होती. त्यानुसार ‘एमएमआरसी’ने गणेशोत्सवादरम्यान ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ केली. मूळ वेळापत्रकानुसार ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील कफ परेड – आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटते. मात्र, गणेशोत्सवादरम्यान शेवटची मेट्रो मध्यरात्री १२ वाजता सुटेल, अशी माहिती ‘एमएमआरसी’कडून देण्यात आली. त्यामुळे भाविकांना रात्री उशिरा गणेश मंडळांना भेट देण्यासाठी वा भेट देऊन घरी परतण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध असणार आहे. सिद्धिविनायक मंदिराला गणेशोत्सवादरम्यान भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. सिद्धिविनायक मंदिरानजीकच ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील सिद्धिविनायक स्थानक आहे. त्यामुळे भाविकांना रात्री उशिरा घरी परतणे सोपे होणार आहे. तसेच दादर, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी आणि गिरगावासारख्या परिसरातील गणेश मंडळांनाही भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्या भाविकांनाही ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या सेवा कालावधीतील वाढीमुळे दिलासा मिळणार आहे.

गणेशमूर्तींसह मेट्रो प्रवासाचीही सुविधा

गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी गणेशमूर्तींसह भाविकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. तशी परवानगी ‘एमएमआरसी’कडून देण्यात आली आहे. मात्र, १८ इंच उंचीच्या गणेशमूर्तींसहच भाविकांना ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे. त्याचवेळी भाविकांना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार आहे. मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वारावर गणेशमूर्तींची स्क्रिनिंग मशीनमध्ये तपासणी होईल आणि त्यानंतरच मूर्ती मेट्रोत नेता येणार आहे.

या स्थानकांवरून रात्री उशिराही मेट्रो प्रवास करता येणार

आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी-अंधेरी, मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी२, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल, धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकर शेठ, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड.