मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी (८ मार्च) मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) आरे – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेतील दोन मेट्रो स्थानकांची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचारी – अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या दोन मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. दोन्ही मेट्रो स्थानकांचे संचालन रविवारी महिला कर्मचारी आणि अधिकारी करणार आहेत.

आरे ते कफ परेड अशी ३३.५ किमीची मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ३ मार्गिका ऑक्टोबर २०२५ पासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. या मार्गिकेला हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. दरम्यान, मुंबईतील या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत.

या मार्गिकेवर २७ महिला मेट्रो पायलट, तसेच विविध विभागांमध्ये १,३८८ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी, तसेच ऑपरेशन्स, तिकीटिंग, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एमएमआरसीएलने महिला कर्मचाऱ्यांना सेवेत प्राधान्य दिले आहे. महिला दिनानिमित्त रविवारी दोन मेट्रो स्थानकांची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली.

मरोळ नाका आणि सीएसएमटी या दोन मेट्रो स्थानकांवरील स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व्यवस्था, देखभाल सहाय्य आणि हाऊसकीपिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिलांकडे असणार आहेत. दिवसभरातील वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये मिळून एकूण ८५ महिला कर्मचारी या स्थानकांचे कामकाज सांभाळतील, अशी माहितीही एमएमआरसीएलने दिली.