मुंबई : आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील मोबाइल नेटवर्कचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दूरसंचार पायाभूत सुविधांचे कंत्राट पुरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा प्रक्रिया सुरू असतानाच रिलायन्स जिओने दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्याचे हक्क आपणास द्यावेत, अशी लेखी मागणी एमएमआरसीकडे केली होती. मात्र ही मागणी एमएमआरसीने फेटाळून लावली आहे. खुल्या निविदेद्वारेच दूरसंचार पायाभूत सुविधांचे कंत्राट दिले जाईल, अशी ठाम भूमिकाही घेतली आहे.
मेट्रो ३ मध्ये मोबाइल नेटवर्क पूर्णतः ठप्प
एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रोची उभारणी करण्यात आली आहे. ही मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल करण्यात आली आहे. ही भुयारी मेट्रो असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांची मोबाइल सेवा अखंड सुरू राहावी, यासाठी मोबाउल नेटवर्कची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे एमएमआरसीने पहिला टप्पा सेवेत दाखल होण्यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार एका परदेशी कंपनीला दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने पायाभूत सुविधा विकसित केली. मात्र वोडाफोन वगळता इतर मोबाइल कंपन्यांनी मेट्रो ३ मध्ये मोबाइल नेटवर्क सेवा पुरविण्यास नकार दिला.
परदेशी कंपनीच्या दरावरून वाद झाला. परिणामी, अन्य कंपन्यांनी या कंपनीच्या माध्यमातून सेवा देण्यास नकार दिला. त्यामुळे आरे – बीकेसी टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर केवळ वोडाफोनचे नेटवर्क उपलब्ध होते. तर पूर्ण क्षमतेने मेट्रो ३ धावू लागल्यानंतरही आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच वोडाफोनचे नेटवर्क उपलब्ध होत होते. त्यामुळे मोबाइल नेटवर्कचा प्रश्न गंभीर बनला. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरसीने अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे अखेर काही दिवसांपूर्वी दूरसंचार पायाभूत सुविधांचे कंत्राट रद्द करून नव्याने कंत्राट प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.
नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करणार
एमएमआरसीच्या निर्णयानुसार कंत्राट रद्द झाल्याने आता मेट्रो ३ मधील नेटवर्क पूर्णतः बंद आहे. वोडाफोनचे नेटवर्कही बंद आहे. तर आता नवीन कंपनीची नियुक्ती होऊन त्यांच्या माध्यमातून सेवा पुरविण्यास सुरुवात झाल्यानंतरच हा प्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी किती दिवस लागणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
दरम्यान परदेशी कंपनीने दूरसंचार पायाभूत सुविधा विकसित केली आहे, ही सेवा खरेदी करून मोबाइल नेटवर्कची सेवा पुरविण्याचे हक्क देण्याची मागणी रिलायन्स जिओने एमएमआरसीकडे केली होती. मात्र ही मागणी एमएमआरसीने फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुल्या निविदेद्वारेच कंत्राटदाराची निवड केली जाईल, अशी ठाम भूमिका एमएमआरसीने घेतली आहे. कोणत्याही दूरसंचार कंपन्यांमध्ये भेदभाव न करता अखंड मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.
