मुंबई : आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेमुळे प्रवास अतिजलद आणि सुकर होत असला तरी या प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अशात आता आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान असलेले एकमेव वोडाफोनचे मोबाईल नेटवर्कही बंद झाले आहे. त्यामुळे आता भुयारी मेट्रोतील मोबाईल नेटवर्क पूर्णत: ठप्प झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त केलेल्या परदेशी कंपनीशी केलेले कंत्राट रद्द केल्याने मोबाईल नेटवर्क पूर्णत: बंद झाले आहे. तर आता नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतरच मोबाईल नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
एमएमआरसीने ३३.५ किमीची भुयारी मेट्रो मार्गिका तीन टप्प्यांत सेवेत दाखल केली आहे. ऑक्टोबर २०२५ पासून ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. या मार्गिकेमुळे उपनगरातून मुंबई शहरात पोहोचणे सोपे होत असल्याने या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होऊन सहा महिने झाले तरी या मार्गिकेत मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
प्रवासादरम्यान कोणाशीही संपर्क होत नसल्याने, कार्यालयीन कामकाज मोबाईल, लॅपटॉपवर करताच येत नसल्यानेही प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळेही काही अंशी प्रवासी संख्येवर परिणाम होत असल्याचाही अंदाज आहे. दरम्यान भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान एकमेव वोडाफोनचे नेटवर्क कार्यान्वित असल्याने वोडाफोनधारकांना दिलासा मिळत होता. पण आता वोडाफोनचेही नेटवर्क बंद झाले आहे. कारण भुयारी मार्गिकेदरम्यान मोबाईल नेटवर्कची सुविधा पुरविण्यासाठी ज्या परदेशी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती त्या कंपनीसोबतचा करार एमएमआरसीने नुकताच रद्द केला आहे. तर आता नव्या कंपनीच्या नियुक्तीसाठी शुक्रवारी नवीन निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
निविदेनुसार १० एप्रिलपर्यंत इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती करून पुढील प्रक्रिया पार पाडत मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बरेच दिवस जाणार आहेत. त्यामुळे मोबाईलशिवाय मेट्रो प्रवास आणखी बरेच दिवस सुरू असणार आहे. नवीन कंत्राटदार आल्यानंतर ज्या मोबाईल कंपन्या नवीन कंत्राटदारासोबत काम करण्यास तयार होतील त्यांचे नेटवर्क भुयारी मेट्रोत सुरू राहील. त्यामुळे आता मोबाईल नेटवर्क केव्हा सुरू होणार याचीच प्रतीक्षा प्रवाशांना असणार आहे. दरम्यान नियुक्त कंत्राटदार आणि मोबाईल कंपन्यांमध्ये काही वाद होता. त्या कंत्राटदारासोबत काम करण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी नकार दिल्याने भुयारी मेट्रोतील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर बनला होता. तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कंत्राटदार कंपनीकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने कंत्राट रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
