मुंबई : आरे – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेतील स्थानकांवरून प्रवाशांना इच्छितस्थळी जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) शक्य तिथे मेट्रो स्थानके नजीकच्या महत्त्वाच्या ठिकाणांशी भुयारी पादचारी मार्गाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील विज्ञान केंद्र मेट्रो स्थानकावरून वरळी समुद्री रस्ता आणि नेहरू तारांगणला जाता यावे यासाठी दोन भूमिगत पादचारी मार्ग बांधण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे.

यासाठी नुकतीच एमएमआरसीकडून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ५२१ कोटी रुपये खर्चाच्या दोन भूमिगत पादचारी मार्गांच्या कामाला महिन्याभरात सुरुवात केली जाणार आहे. तर काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करून दोन्ही पादचारी मार्ग सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. दोन्ही भूमिगत मार्ग २०२८ मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात तीन भूमिगत पादचारी मार्ग प्रस्तावित

एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीची आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिका उभारली. ही मार्गिका टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल करण्यात आली असून मेट्रो ३ आज पूर्ण क्षमतेने धावत आहे. मेट्रो ३ मार्गिकेमुळे विमानतळ, साकीनाका, बीकेसी, धारावी, दादर, वरळी, काळबादेवी, गिरगाव, चर्चगेट, विधानभवन येथे जाणे सोपे झाले आहे.

मात्र, त्याचवेळी मेट्रो ३ मार्गिकेतील स्थानकांपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, बेस्ट अशा पर्यायांचा वापर करावा लागतो. त्यात वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे मेट्रो स्थानकांवरून इच्छितस्थळी अतिजलद जाता यावे यासाठी काय करता येईल, या विचारातून एमएमआरसीने भूमिगत पादचारी पुलांद्वारे मेट्रो स्थानके आणि आसपासची महत्त्वाची ठिकाणे जोडण्याची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात तीन भूमिगत पादचारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले. वांद्रे – कुर्ला संकुल स्थानक येथे एक आणि विज्ञान केंद्र स्थानक येथे दोन मार्ग बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर विज्ञान केंद्र स्थानक येथील दोन मार्गांसाठी निविदा प्रक्रिया राबवून ती अंतिम करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जे. कुमार कंपनीला काम

नेहरू तारांगण आणि वरळी समुद्री रस्त्याला जोडणाऱ्या दोन भूमिगत पादचारी मार्गांच्या कामाचे कंत्राट जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विज्ञान केंद्र – वरळी समुद्री रस्ता हा भूमिगत पादचारी मार्ग १.१ किमी लांबीचा असून हा मार्ग महालक्ष्मी रेसकोर्सखालून जाणार आहे. तर दुसरा भूमिगत पादचारी मार्ग ५०० मीटर लांबीचा असून हा मार्ग विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक ते नेहरू तारांगण अशी जोडणी देणार आहे.

हे दोन्ही भूमिगत पादचारी मार्ग ५ मीटर रुंद असणार असून यात सरकते जिने, उद््वाहक अशा सुविधा असणार आहेत. या दोन्ही मार्गांच्या कामासाठी ५२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही भूमिगत पादचारी मार्ग सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना नेहरू तारांगण आणि वरळी समुद्री रस्ता गाठणे सोपे होणार आहे. रस्त्यांवरील गर्दी व वाहनांची गर्दी टाळून प्रवाशांना सुलभपणे इच्छितस्थळी जाता येणार आहे. दरम्यान, वांद्रे-कुर्ला संकुल येथे १.४ किमी लांबीचा भूमिगत पादचारी पूल बांधण्यात येणार असून हा मार्ग टाटा वसाहतीमार्गे बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडला जाणार आहे. हा मार्ग १.४ किमीचा असणार असून यासाठीही लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करून कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.