मुंबई...आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टी २ मेट्रो स्थानकात बुधवारी धूर निघाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) आवश्यक उपायोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. मात्र यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरील वाहतूक दुपारी ३० मिनिटे विस्कळीत झाली.
मेट्रो ३ मार्गिका टप्प्याटप्प्यात सेवेत दाखल झाली असून आॅक्टोबर २०२५ पासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून यात छोट्यामोठ्या दुर्घटनांची, वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची मालिका सुरूच आहे. बुधवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास टी२ मेट्रो स्थानकावर धूर पसरल्याचे लक्षात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ स्थानक रिकामे करण्यात आले. स्थानकातील पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे टी २ स्थानक ते आरे स्थानकादरम्यान सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. त्यामुळे ४.१५ ते ४.४५ दरम्यान वाहतूक अंशत विस्कळीत झाली होती. धूर नेमका कशामुळे निघाला हे समजू शकले नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूक पूर्ववत झाली.
