मुंबई : ‘आरे – कफ परेड मेट्रो ३’ मार्गिकेवर शुक्रवारी सकाळी आणि दुपारी सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका दिवसभर प्रवाशांना सोसावा लागला. ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील स्थानकांमध्ये मोट्रो गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक प्रवाशांचा तेथील कर्मचाऱ्यांबरोबर वादही झाला. अखेर तांत्रिक बिघाडामुळे मोट्रे ३ मार्गिकेवर सुमारे ३० मिनिटे मोट्रो गाडी बोगद्यात खोळंबल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिलगीरी व्यक्त केली.
‘आरे – कफ परेड मेट्रो ३’ मार्गिकेवर शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो गाडी सुमारे ३० मिनिटे बोगद्यात खोळंबली. मेट्रो स्थानकांवर गाडीच येत नसल्याने प्रवाशांचा गोधळ उडाला होता. केवळ तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो विस्कळीत झाल्याचे स्थानकात तैनात कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. परंतु कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत असल्याने प्रवासी कमालीचे अस्वस्थ झाले होते. एरवी जलद प्रवासाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांचा शुक्रवारी खोळंबा झाल्याने ते प्रचंड संतापले होते.
सकाळी तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र पुन्हा दुपारी तांत्रिक बिघाड झाला आणि सेवा कोलमडली. दरम्यान, याबद्दल एमएमआरसीने दिलगीरी व्यक्त केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एमएमआरसीच्या तांत्रिक व संचालन पथकांनी तातडीने परिस्थिती हाताळली. आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करून मेट्रो सेवा पूर्ववत केली, असे एमएमआरसीने दिलगीरी व्यक्त करताना स्पष्ट केले.
दरम्यान, प्रभावित प्रवाशांच्या तिकीट भाड्याच्या परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रत्यक्ष तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांना तत्काळ परतावा देण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी परतावा मिळण्यासाठी ग्राहक सेवा माध्यमांद्वारे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन एमएमआरसीतर्फे करण्यात आले आहे.
