Mumbai Metro 3 Ticket Controversy: प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटावर ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे नाव ‘सीएसएस टर्मिनस मेट्रो’, तर जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाचे नाव ‘जेएसएस मेट्रो’ असे नमूद करण्यात येत असून यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकीटावर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने मुंबई मेट्रो रेल्वे काॅरपोरेशनच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. एका महिन्यात तिकीटावरील नावात सुधारणा करण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कुलाबा – वाद्रे – सिप्झ दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ३ मार्गिकेवर २७ स्थानके असून दक्षिण मुंबईमधील दोन मेट्रो स्थानकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक’ आणि ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मेट्रोच्या तिकिटांवर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानका’चे नाव ‘सीएसएम टर्मिनस मेट्रो’, तर ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानका’चे नाव ‘जेएसएस मेट्रो’ असे नमूद करण्यात येत आहे. याबद्दल नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटांवर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक’ आणि ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक’ असा संपूर्ण नावाचा स्पष्ट उल्लेख मराठी आणि इंग्रजी भाषेत झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी मराहाज महाराष्ट्राचे दैवत आहेत, तर जगन्नाथ शंकरशेट यांचा मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. या दोन्ही व्यक्तींच्या नावाचा तिकीटावर ‘सीएसएम टर्मिनस मेट्रो’ आणि ‘जेएसएस मेट्रो’ असा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे. हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिला आहे.
‘मेट्रो ३’ मार्गिकेतून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत आहेत. पर्यटकांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही महान व्यक्तींचा तिकीटावर अशा पद्धतीने करणे योग्य नाही. नवख्या प्रवाशांना या दोन्ही व्यक्तींचे नाव व्यवस्थित समजायला हवे. तिकिटावर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक’ आणि ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक’ असा संपूर्ण उल्लेख मराठी आणि इंग्रजी भाषेत करावा. तिकीटावरील नावात एक महिन्यात सुधारणा करावी अन्यथा मुंबई मेट्रो रेल्वे काॅरपोरेशनविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲड. चोणकर यांनी दिला.

