मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो-३ मार्गिकेच्या बोगद्याला कूपनलिका (बोअर वेल) खोदताना धक्का लागल्याचे उघडकीस आले आहे. मेट्रो सिनेमा परिसरातील शासकीय कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली असून एमएमआरसीने याप्रकरणी संबंधित पाणीपुरवठा कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मेट्रो-३ च्या सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे एमएमआरसीने स्पष्ट केले.
मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली आरे- कफ परेड दरम्यानची ३३.५ किलोमीटर लांबीची मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ३ मार्गिका ऑक्टोबर २०२५ मध्ये पूर्ण क्षमतेने धावू लागली. या मार्गिकेवरील स्थानक थेट सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडण्यात आल्याने प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईत टँकरने पाणीपुरवठा करणार्या एका कंत्राटदाराने दक्षिण मुंबईतील सीएसएमटी मेट्रो स्थानकाजवळील शासकीय कार्यालयाच्या आवारात दोन दिवसांपूर्वी कूपनलिका खोदण्याचा प्रयत्न केला. मात्र हे खोदकाम सुरू असताना सीएसएमटी रेल्वे स्थानकानजीकच्या मेट्रो ३ च्या भुयाराचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मेट्रोच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेमुळे मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसून मेट्रो सेवा सुरळीत असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले. या घटनेची दखल घेऊन एमएमआरसीने संबंधित कंत्राटदाराविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मेट्रोच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेट्रो लाइन-३ च्या दोन्ही बाजूंनी ५० मीटरच्या क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी एमएमआरसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदाराने पूर्वपरवानगी न घेताच कूपनलिकेसाठी खोदकाम सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.
महापालिकेचीही परवानगी नाही!
कूपनलिकेच्या खोदकामासाठी मुंबई महानगरपालिकेचीही परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागतो. संबंधित कंत्राटदाराने महापालिकेकडेही असा अर्ज केला नसल्याचे महापालिका अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व व्यक्ती, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन एमएमआरसीतर्फे पुन्हा करण्यात आले आहे.
