मुंबई: मुलुंड येथील मेट्रो ४ च्या कामावेळी संरक्षक कठडा कोसळून झालेला एका व्यक्तीचा मृत्यू, त्याचप्रमाणे धावत्या कारवर लाकडी फळी कोसळण्याची घटना या अपघातांवरून मेट्रोच्या कामात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर त्रूटी राहत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही अपघातांचे चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावेत व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
एमएमआरडीए चे आयुक्त संजय मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रात कोटेचा यांनी मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पस्थळी वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. एकाच ठिकाणी अशा घटना पुन: पुन्हा घडत असल्याने ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी संरक्षक भिंतीचा एक भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण जखमी झाले होते. सोमवारी सकाळी त्याच ठिकाणापासून अवघ्या १० मीटर अंतरावर आणखी एक घटना घडली. त्यात लाकडी फळी धावत्या कारवर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना पुन्हा घडत असल्याने गंभीर निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट असल्याचे कोटेचा यांनी पत्रात नमूद केले आहे.
या वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाकडी फळी कोसळल्याच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच संरक्षक कठडा कोसळल्याच्या आधीच्या चौकशी अहवालाची प्रत देण्यात यावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली. त्यांनी मिलान बिल्डटेक एलएलसी यांना दिलेला करार रद्द करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटी सहन केल्या जाणार नाहीत. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एमएमआरडीएने तात्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
