मुंबई : वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान सोमवारी पुन्हा अपघात झाला आहे. फेब्रुवारीमध्ये कामादरम्यान उंचावरून सिमेंटचा वजनदार कठडा कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात जिथे झाला होता त्या ठिकाणापासून १० मीटर अंतरावर मुलुंड पश्चिम येथे सोमवारी पुन्हा अपघात झाला आहे. उंचावरून एक लाकडी फळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका चारचाकीवर आदळली. अपघातग्रस्त चारचाकी फोर्टिस रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजार विभागाच्या संचालक डॉ. अनिता मॅथ्यू यांची होती. त्या या अपघातात थोडक्यात बचावल्या. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा अपघात झाल्याचा आरोप करून स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी कंत्राटदार मिलान बिल्डटेक एलएलसीचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान फेब्रुवारीत मोठा अपघात घडला होता आणि यात तीन जण जखमी झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) मोठी टीका झाली. या प्रकरणी त्यावेळी पाच जणांना अटकही झाली होती. एमएमआरडीएने काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई केली होती. सल्लागाराची हकालपट्टीही केली होती. मात्र आता एमएमआरडीएने सल्लागाराचे कंत्राट कायम ठेवत सल्लागाराला अभय दिले आहे. ही घटना घडून दोन महिनेही उलटले नसताना त्याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर सोमवारी पुन्हा एक अपघात घडला आहे. सोमवारी सकाळी मुलुंड, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे मेट्रोच्या कामादरम्यान उंचावरून मोठी लाकडी फळी रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीवर आदळली. यात चारचाकीचे नुकसान झाले, तर डॉ. मॅथ्यू थोडक्यात बचावल्याची माहिती कोटेचा यांनी दिली.

मॅथ्यू या मुंबईतील नामांकित डॉक्टर असून करोना काळातील त्यांचे काम उल्लेखनीय मानले जाते. हा अपघातही फेब्रुवारीतील अपघाताप्रमाणे कंत्राटदार मिलान बिल्डटेक एलएलसीच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, एमएमआरडीएने मात्र मुलुंड येथे मेट्रो ४ च्या कामादरम्यान कोणताही अपघात घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असे काही घडले आहे का याचा तपास सल्लागार कंपनीकडून सुरू असल्याची माहितीही एमएमआरडीएने दिली आहे. एमएमआरडीएच्या या स्पष्टीकरणावर कोटेचा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी लवकरच महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.