मुंबई : मुंबईला मेट्रोने ठाण्याशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा टप्पा आतापर्यंत सेवेत दाखल होणे अपेक्षित होते, मात्र या टप्प्याच्या संचालनासाठी विलंब झाला आहे. या टप्प्याच्या संचालनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आता एमएमआरडीएने पार केला असून त्यासाठी अखेर एमएमआरडीएला रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तेव्हा आता सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यान मेट्रो धावू लागेल आणि ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल. सप्टेंबर २०२५ पासून चाचण्या एमएमआरडीएकडून ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ आणि २.७ किमीच्या ४ अ मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने काम सुरू असून गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशा १०.५ किमीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान या टप्प्याचे काम पूर्ण करून हा टप्पा २०२५ मध्ये सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे होते. त्यानुसार सप्टेंबर २०२५ मध्ये या टप्प्यावर मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.

चाचण्या पूर्ण करून आरडीएसओ आणि सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत हा टप्पा सेवेत दाखल केला जाणार होता, मात्र आता जून २०२६ उजाडले तरी हा टप्पा सेवेत दाखल झालेला नाही. त्यामुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबत चालले आहे. चाचण्यांना कित्येक महिने उलटून गेले तरी मेट्रो धावत नसल्याने नाराजी वाढत आहे. एमएमआरडीएवर टीका होत आहे, पण आता लवकरच हा टप्पा सेवेत दाखल होणार आहे. सीएमआरएस चाचण्यांसाठी लवकरच एमएमआरडीएकडून अर्ज गायमुख ते कॅडबरी जंक्शन टप्प्यासाठी मंगळवारी, २ जूनला आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तब्बल २०९ दिवसांच्या चाचण्यांनंतर हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने हा टप्पा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर आता शेवटच्या टप्प्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सीएमआरएसकडे अर्ज केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सीएमआरएस चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आणि सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर गायमुख ते कॅडबरी जंक्शन टप्पा सेवेत दाखल केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.