मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामाअंतर्गत विमानतळ परिसरातील मेट्रोच्या उन्नत मार्गिकेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, या परिसरातील सुमारे २६० कोटी रुपयांचे बांधकाम पाडून पुन्हा उभारण्याची वेळ एमएमआरडीएवर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता ही नामुष्की टळण्याची चिन्हे आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) उंचीच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. अद्ययावत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीममुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबतच्या अडचणी दूर होण्याची शक्यता असल्याने हे बांधकाम पाडण्याची गरज भासणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, यासंबंधीच्या अंतिम निर्णयाची एमएमआरडीएला प्रतीक्षा आहे.

एमएमआरडीए दहिसर–गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार मेट्रो ७ अच्या माध्यमातून विमानतळापर्यंत करीत आहे. ही मार्गिका ३.४४ किलोमीटर लांबीची असून, त्यापैकी २.४९ किलोमीटरचा भाग भुयारी, तर एक किलोमीटरचा भाग उन्नत आहे. या मार्गिकेचे ७०.७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. निर्धारित वेळेत या मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र, विमानतळ परिसरातील उन्नत मार्गिकेच्या बांधकामात उंचीच्या मर्यादेचा अडथळा निर्माण झाल्याने कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

मंजूर मर्यादेपेक्षा बांधकामाची उंची अधिक होत असल्याने विमानतळ प्राधिकरणाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सुमारे २६० कोटी रुपयांचे बांधकाम पाडून पुन्हा उभारण्याची वेळ एमएमआरडीएवर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. नियमानुसार, उंचीची मर्यादा ०.५३ ते २.७५ मीटरदरम्यान असते. त्यानुसार मार्गिकेचे बांधकाम करताना विद्युत उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त उंचीचाही विचार करणे गरजेचे होते. मात्र, एमएमआरडीएकडून याचा पुरेसा विचार न करता काम करण्यात आल्याने विद्युत उपकरणांची उंची निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होत असल्याचे समोर आले. त्यामुळे एमएमआरडीएसमोर पेच निर्माण झाला होता. सुमारे २६० कोटी रुपयांचे बांधकाम पाडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने एमएमआरडीएच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता एमएमआरडीएला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ प्राधिकरणाच्या अद्ययावत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीममुळे (आयएलएस) विमानांच्या धावपट्टीकडे येण्याच्या आणि तेथून उड्डाण करण्याच्या प्रक्रियेबाबतची चिंता कमी झाली आहे. आयएलएस ही जमिनीवर आधारित रेडिओ दिशादर्शन प्रणाली असून, कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही वैमानिकाला विमान धावपट्टीकडे सुरक्षितपणे नेण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यामुळे उंचीच्या मर्यादेचा अडथळा दूर होण्याची शक्यता असल्याने विमानतळ प्राधिकरणाने २६० कोटी रुपयांच्या बांधकामाला अभय देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंबंधीचा मूल्यांकन अहवाल विमानतळ प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे सादर केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. प्राधिकरणाने अंतिम निर्णय जाहीर केल्यानंतरच या बांधकामाला अधिकृतपणे अभय मिळणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असतानाही एमएमआरडीएकडून या परिसरातील बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानतळ प्राधिकरणाकडून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याने कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

………….