मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिकांच्या कामादरम्यान सुरक्षेअभावी अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. रविवारी, २० सप्टेंबरला दुपारी दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान उंचावरून सिमेंटचा मोठा तुकडा कोसळून एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवडाभरात मेट्रोच्या कामादरम्यान तीन अपघात झाले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित होत आहे.
एमएमआरडीएकडून मेट्रो ९ मार्गिकेतील काशीगाव ते मिरा-भाईंदर या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान मेट्रो ९ मार्गिकेचे काम सुरू झाल्यापासून कामादरम्यान १४ हून अधिक अपघात झाले असून यात अंदाजे सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ सप्टेंबरला मेट्रो ४ च्या कामादरम्यान वडाळ्यात लोखंडी मचान कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर १८ सप्टेंबरला मेट्रो ४ मार्गिकेच्याच कामादरम्यान विक्रोळीत रस्ता रोधक अंगावर पडल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच रविवारी, २० सप्टेंबरला मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
मेट्रो ९ च्या कामादरम्यान काश्मिरा परिसरात उंचावरून सिमेंटचा मोठा तुकडा एका तरुणाच्या अंगावर पडला आणि त्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. शादाब असे या तरुणाचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर शादाब सुमारे एक तास रस्त्यावर पडून होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे कोणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नाही. मात्र एका व्यक्तीच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांना घेरले. याविषयी एमएमआरडीएकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही, मात्र कंत्राटदाराविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कंत्राटदार कंपनीला २२ कोटींहून अधिक दंड
या अपघातांबाबत कंत्राटदार जे. कुमार कंपनीच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याप्रकरणी कंपनीला आतापर्यंत एमएमआरडीएसह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) २२ कोटींहून अधिकचा दंड ठोठावला आहे. तर दुसरीकडे मेट्रो ४ सह मार्गिकेच्या कामादरम्यानही मोठे अपघात झाले असून या प्रकल्पातील कंत्राटदारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर आणि त्यांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश एमएमआरडीएकडून देण्यात आल्यानंतरही कंत्राटदारांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
