मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर-काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकेचे लोकार्पण मागील तीन-चार महिन्यांपासून रखडले होते. पण अखेर राज्य सरकारने शुक्रवार, ३ एप्रिलचा मुहूर्त काढला. त्यानुसार शुक्रवारी या दोन्ही मार्गिकेतील दोन टप्प्यांचे लोकार्पण, पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणास प्रारंभ होणार होता.
मुंबईला आणखी दोन मेट्रो मार्गिका मिळणार असल्याने आणि मिरा-भाईंदरवासीयांचे, पूर्व उपनगरवासीयांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र आता शुक्रवारचे सर्व कार्यक्रम राज्य सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण काहीसे लांबणीवर गेले आहे. तर आता या कार्यक्रमांसाठी राज्य सरकारने सोमवार, ६ एप्रिलला मुहूर्त दिला आहे. त्यामुळे आता सोमवारी दोन मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्याचे काम पूर्ण होऊन या टप्प्यांच्या सुचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्रही याआधीच मिळाले आहे. मात्र विविध कारणांनी या टप्प्यांचे लोकार्पण रखडल्याने मेट्रोची सुविधा उपलब्ध असूनही त्याचा लाभ मुंबईकरांना घेता येत नसल्याचे चित्र होते. अखेर राज्य सरकारने दोन मार्गिकेच्या लोकार्पणासह पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या भूमिपूजनासह ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्टमधील टीबीएम भूमिगत सोडून भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्यासाठी शुक्रवारची तारीख दिली. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयारी सुरू केली. तयारी अंतिम टप्प्यात असताना बुधवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारचे कार्यक्रम रद्द केल्याने लोकार्पण, भूमिपूजन काहीसे लांबणीवर गेले आहे. शुक्रवारचे कार्यक्रम रद्द करतानाच सरकारने कार्यक्रमासाठी सोमवार, ६ एप्रिलची वेळ दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मिरा-भाईंदरवासीयांना, पूर्व उपनगरवासीयांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
मेट्रो लोकार्पणासह इतर कार्यक्रम रद्द करण्याचे नेमके कारण देण्यात आलेले नाही. मात्र आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील निवडणुकांसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते प्रचारात व्यस्त असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान आता राज्य सरकारने लोकार्पणासह इतर कार्यक्रमासाठी सोमवार, ६ एप्रिलची वेळ दिली आहे. त्यामुळे आता सोमवारी मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण होईल आणि त्यानंतर मंगळवारी, ७ एप्रिलला दोन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होतील, अशीही माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.
